न्यूझीलंड अ विरुद्धच्या वन डे संघात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याची निवड झाली आणि हा आनंद त्याने मैदानावर दणक्यात साजरा केला. दुलीप चषक ( Duleep Trophy) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीनंतर त्याने उपांत्य फेरीतही शतकी खेळी करून वेस्ट झोन ( West Zone vs Central Zone ) चे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले. सेंट्रल झोनविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतकी खेळीनंतर पृथ्वीने दुसऱ्या डावात खणखणीत शतक झळकावले. वेस्ट झोनचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर पृथ्वीने डाव सावरला.
कोईम्बतूर येथे दुलीप चषक स्पर्धेतील पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग ( West Zone vs Central Zone) असा सामना सुरू आहे. पृथ्वी शॉ व राहुल त्रिपाठी यांची अर्धशतकं व शॅम्स मुलानी व तनूष कोटीयन यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर वेस्ट झोनने २५७ धावा उभ्या केल्या. कुमार कार्तिकेयाने ६६ धावा देताना ५ विकेट्स घेऊन वेस्ट झोनचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात जयदेव उनाडकट व तनुष कोटीयन यांनी प्रत्येकी ३ व ए शेठने दोन विकेट्स घेत सेंट्रल झोनचा पहिला डाव १२८ धावांत गुंडाळला.
वेस्ट झोनने १२९ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पृथ्वीने दमदार खेळ केला, परंतु यशस्वी ( ३), अजिंक्य ( १२), राहुल (०) हे लगेच माघारी परतले. पण, पृथ्वीने दमदार खेळ करताना ८८ चेंडूंत शतक झळकावले. त्यानंतर आज पृथ्वीने आणखी आक्रमक खेळ केला. त्याने १४० चेंडूंत १४२ धावा केल्या. १५ चौकार व ४ षटकारासह त्याने १९ चेंडूत ८४ धावा कुटल्या. अरमान जाफरसह त्याने वेस्ट झोनचा डाव सावरला होता, परंतु करन शर्माने त्याला बाद केले. अरमानही ४९ धावांवर दुर्दैवी झेलबाद झाला. वेस्ट झोनने ५ बाद २५४ धावा करताना आघाडी ३८३ धावा अशी मजबूत केली आहे.