Sri Lanka vs Pakistan 1st Test : कर्णधार बाबर आजमच्या ( Babar Azam) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला चांगले प्रत्युत्तर दिले. बाबर वन मॅन आर्मीसारखा खेळला. यजमानांच्या पहिल्या डावातील २२२ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ७ फलंदाज ८५ धावांत तंबूत परतले होते, तेव्हा कर्णधार बाबरने एक बाजू लावून धरताना संघाला २१८ धावांपर्यंत पोहोचवले. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद नवाज व यासिर शाह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत पाकिस्तानला मजबूत पकड घेऊन देण्याचा प्रयत्न केला आहे. या सामन्यात फिरकीपटू यासिर शाह ( Yasir Shah) याने घेतलेल्या एका विकेटची तुलना महान फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याच्या 'Ball of the Century' शी होतेय.
मित्र मित्र म्हणत बाबर आजमने Virat Kohliचा आणखी एक मोठा विक्रम मोडला; पण, सहकाऱ्यांनीच घात केला
यजमान श्रीलंकनेने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावांपर्यंत मजल मारली. दिनेश चांडिमल ( ७६), ओशाडा फर्नांडो ( ३६) व महिश तीक्शाना ( ३८) यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. प्रत्युत्तरात प्रभात जयसुर्याने पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी पाठवला. पाकिस्तानची अवस्था ९ बाद १४८ अशी झालेली असताना बाबर व नसीम शाह यांनी संघर्ष केला. बाबरने ८व्या, ९व्या व दहाव्या विकेटसाठी अनुक्रमे २७ ( यासीर शाह, ७९ चेंडू), ३६ ( हसन अली, ४९ चेंडू) व ७० ( नसीम शाह, १८५ चेंडू) धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा डाव सावरला. बाबर २४४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११९ धावांवर माघारी परतला अन् पाकिस्तानचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. नसीम ५२ चेंडूंत ५ धावांवर नाबाद राहिला.
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात कर्णधार दिमुथ करुणारत्न ( १६) व कसून रजिथा ( ७) हे माघारी परतल्यानंतर सलामीवीर ओशादा फर्नांडो व कुसल मेंडिस यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. या दोघांनी श्रीलंकेला मजबूत आघाडीच्या दिशेने कूच करून दिली. यासिरने श्रीलंकेला तिसरा धक्का देताना ओशादाला ६४ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या अँजेलो मॅथ्यूजला (९) बाद करून मोहम्मद नवाजने डावातील तिसरी विकेट घेतली. पण, चर्चेत आली ती कुसल मेंडिसची विकेट. यासिरने टाकलेल्या चेंडूने चांगलाच वळण घेत मेंडिसचा ( ७६) त्रिफळा उडवला. यासिरच्या या चेंडूची आता बॉल ऑफ दी सेंच्युरीशी तुलना होत आहे. श्रीलंकेने ५ बाद १९८ धावा करून २०२ धावांची आघाडी घेतली आहे.