New Zealand vs Sri Lanka 1st Test : केन विलियम्सनने ( Kane Williamson) अखेरच्या चेंडूवर डाईव्ह मारली... श्रीलंकेच्या खेळाडूने अचूक नेम धरत चेंडू यष्टींच्या दिशेने फेकला.... केनची बॅट क्रिजच्या आत सरकली अन् तेवढ्यात चेंडू यष्टिंवर आदळला अन् जोरदार अपील झाले... धाकधूक वाढलेली... ७० षटकांत २८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केन व डॅरील मिचेल यांनी प्रचंड घाम गाळलेला आणि त्याचा शेवट गोड व्हावा अशी सर्वांचीच इच्छा होती. न्यूझीलंडची ही एक धाव भारतासाठीही महत्त्वाची होती आणि त्यामुळे भारतीय फॅन्सही या सामन्यावर लक्ष ठेवून होते.
अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच भारत WTC Final मध्ये; मित्राने केली 'अमूल्य' मदत! थरारक सामना
यापूर्वीच्या १० षटकांत मिचेल व केन यांनी ७.५०च्या सरासरीने धावा चोपल्या. केन व मिचेल यांनी १५७ चेंडूंत १४२ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मिचेल ८६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर बाद झाला. टॉम ब्लंडल ( ३) लगेच माघारी परतला. न्यूझीलंडला ३२ चेंडूंत ३९ धावांची गरज असताना निम्मा संघ माघारी परतला होता. केनने २७वे कसोटी शतक पूर्ण करताना किवींच्या विजयाचे प्रयत्न सुरू ठेवले होते. ३ षटकांत २० धावा किवींनी करायच्या होत्या आणि मिचेल ब्रेसवेल १० धावांवर बाद झाला. टीम साऊदीही बाद झाला अन् ६ चेंडू ८ धावा असा सामना रंजक वळणावर आला.
त्यातही एक विकेट पडलीच... केन खंबीरपणे उभा राहिला आणि शेवटच्या चेंडूवर १ धाव असा सामना होता.असिथा फर्नांडोने बाऊन्सर फेकला अन् केनचा फटका चूकला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवून नील वॅगनर एक धाव घेण्यासाठी पळाला होता. केननेही क्रिज सोडून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यष्टिरक्षकाने स्ट्रायकर एंडला थ्रो केला, परंतु चेंडू यष्टिंवर आदळला नाही. तो असिथाच्या हाती विसावला. असिथाने त्वरित तो नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने फेकला अन् चेंडू यष्टिंवर आदळला. पण, त्याआधी केनने डाईव्ह मारली होती... केनची झेप सफल ठरली अन् न्यूझीलंडने थरारक विजयाची नोंद केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"