प्रसाद लाड : ट्वेन्टी-20 मालिका जिंकल्यावर भारतीय संघ एकदिवसीय लढतींमध्येही बाजी मारणार, असे कर्णधार विराट कोहलीचे चाहते म्हणत होते. पण तसं काही झालं नाही. एकदिवसीय मालिका भारताला गमवावी लागली. या पराभवाची नेमकी कारणं, तुम्हाला माहिती आहेत का?
या पराभवाची कुणकुण दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात लागली होती. या सामन्यात भारताचा पराभव झाला, पण कोहलीसेनेने तो मनावर घेतला नाही किंवा त्यामधून बोध घेतला नाही. हा सामना होता कार्डिफला. तिथे वातावरण थंड होतं. चेंडू स्विंग होत होता. आणि या मैदानातला मोसमातला हा पहिलाच सामना होता. खेळपट्टी ताजी होती. चेंडू हळूवारपणे बॅटवर येत होता. आयपीएलच्या मुशीत वाढलेला हा भारतीय संघ आहे. त्यामुळे फक्त फटके मारायचे हे त्यांना ठाऊक, पण खेळपट्टीनुसार थोडा वेळ घेऊन फटके मारणं, त्यांना जमलं नाही. धोनीने तसं अखेरच्या षटकात करून दाखवलं.
पहिला एकदिवसीय सामना कुलदीप यादव आणि रोहित शर्मा यांच्या जीवावर आपण जिंकलो. कोहलीसारखा खेळाडू या सामन्यात स्थिरस्थावर झाल्यावर यष्टीचीत झाला हे दुर्देव. दुसरा सामना रंगला तो क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर. जो रुटच्या शतकाने इंग्लंडला तिनशे धावांचा पल्ला गाठून दिला. पण भारताच्या 'शेर' फलंदाजांची ससेहोलपट झाली. महेंद्रसिंग धोनीच्या या खेळीवर टीका झाली. धोनी आपली खेळी कशी साकारतो, हे एकदा चाहत्यांनी समजून घ्यायला हवं, दुसरीकडे धोनीला आतापर्यंत चांगली खेळी उभारता आली नाही, हेदेखील तेवढंच सत्य आहे.
तिसऱ्या सामन्यात भारत पुन्हा पराभूत झाला. मालिका गमावली. भारत हा सामना हरणार, हे कोहली ज्यापद्धतीने त्रिफळाचीत झाला, ते पाहिल्यावर कळू शकतं. कारण स्थिरस्थावर झालेला फलंदाज अशा प्रकारे बोल्ड होतो, हे पाहणं क्लेशदायक होतं. समोर पडलेला चेंडू वळणार, हे त्याला सरोम दिसतं होतं. पण तरीदेखील त्यावर कोहलीला फटका लगावता आला नाही. कोहली मॅच फिनिशर आहे, पण या मालिकेत त्याचं हे फिनिशिंग दिसलं नाही.
रोहित, धवन, धोनी, पंड्या, राहुल, रैना... हे भारताचे फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे कुलदीप यादव वगळता एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. ज्या आदिल रशिदचे चेंडू चांगले वळत होते, कोहलीला त्यानं बाद केलं. पण भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलची फिरकी मात्र प्रभावी ठरली नाही.
इंग्लंडचा दौरा भारतासाठी कधीच सोपा राहिलेला नाही. इंग्लंडच्या दौऱ्यातील खास गोष्ट म्हणजे वातावरण आणि खेळपट्टी. इंग्लंडचं वातावरण सारखं बदलत असतं, त्याची भारतीयांना सवय नाही. खेळपट्टी ही त्यानुसार काहीशी संथ होत जाते. चेंडू चांगलेच स्विंग होतात. त्यामुळे काही गोष्टी भारताच्या खेळाडूंनी नव्याने शिकायला हव्यात. आपण अव्वल आहोत, या गोष्टीचा अहंकार नसावा. खेळपट्टीनुसार खेळ बदणं शिकायला हवं. नाहीतर एकदिवसीय मालिकेत पराभव झालाच आहे, या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर कसोटी मालिका गमवायची वेळही आल्यावाचून राहणार नाही.