कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13 व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा 15 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली, परंतु सद्यस्थिती पाहता आयपीएल होण्याची शक्यता मावळत चालली आहे. याचबरोबर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या टीम इंडियातील पुनरागमनाच्या आशाही संपुष्टात येत चालल्या आहेत.
इंग्लंडमध्ये गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. धोनीनं निवृत्ती घ्यायला हवी अशी चर्चा सुरू असताना आयपीएलमधील कामगिरीवर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, असा संदेश मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला होता. पण, आता कोरोनामुळे आयपीएल होण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. गौतम गंभीर म्हणाला,''यावर्षी आयपीएल न झाल्यास, धोनीचे टीम इंडियातील पुनरागमन अवघडच आहे. तो गेली दीड वर्ष क्रिकेट खेळलेला नाही आणि मग कोणत्या आधारावर त्याची टीम इंडियात निवड केली जाईल. धोनीला पर्याय म्हणून लोकेश राहुलला संधी द्यायला हवी. त्यानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडली आहे. फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून त्याची कामगिरी मी पाहिली आहे. ''
तो पुढे म्हणाला,''यष्टिंमागे राहुल धोनीपेक्षा सरस नक्कीच नाही, परंतु तुम्ही ट्वेंटी-20 क्रिकेटचा विचार करत असाल, तर राहुल हा सक्षम पर्याय आहे. तो यष्टिरक्षणही करू शकतो आणि 3 किंवा 4 क्रमांकावर फलंदाजीलाही येऊ शकतो. त्यामुळे आयपीएल न झाल्यास धोनीच्या पुनरागमनाच्या आशा मावळतील. पण, निवृत्तीचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक आहे.''
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!
लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा
शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न
क्रिकेटला ब्रेक तरीही विराट कोहली टॉप; आयसीसीनं पोस्ट केली मजेशीर आकडेवारी
'अपेक्षा वि. वास्तव'; सानिया मिर्झाकडून पती शोएब मलिकाला लग्नाच्या हटके शुभेच्छा