भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी वर्चस्व गाजवले. येथे आफ्रिकेचे फलंदाज बॅकफुटवर गेले असले तरी दूर देशात कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये आफ्रिकेच्या जेपी ड्यूमिनीनं बुधवारी अफलातून कामगिरी केली. त्रिनबागो नाइट रायडर्स आणि बार्बाडोस ट्रायडंट्स यांच्यातील सामन्यातील हा प्रसंग. या सामन्यात ट्रायडंट्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ड्यूमिनीनं जोनाथन कार्टरच्या साथीनं अफलातून झेल घेतला.
रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 134 धावा केल्या. लेंडन सिमन्सने 45 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 60 धावा चोपल्या. त्याला अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ मिळाली नाही. ट्रायडंट्सच्या शकिब अल हसन ( 2/25), हॅरी गनरे ( 2/14) आणि हेडन वॉल्श ( 2/34) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ट्रायडंट्सने 19.4 षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. जॉन्सन चार्ल्स ( 55) आणि अॅलेक्स हेल्स ( 33) यांनी दमदार सलामी करून दिली.
या सामन्याच्या पहिल्या डावात ड्यूमिनी अन् कार्टर या जोडीनं अफलातून झेल घेतला. 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ड्यूमिनी आणि कार्टर यांनी हा झेल टिपला. मार्क डेयालने टोलावलेला उत्तुंग चेंडू पकडण्यासाठी ड्यूमिनी धावला, परंतु त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू त्याच्या हातून निसटला. पण, तितक्यात त्याच्या विरुद्ध दिशेनं कार्टर धावून आला होता आणि त्यानं एकहातानं तो चेंडू झेलला. या दोघांचा हा झेल सोशल मीडिवर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ...