मुंबई - माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीने बुधवारी रात्री यूएईमध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला. त्यामध्ये, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची निवड लक्षवेधी ठरली. खेळाडू म्हणून नाही, तर संघाचा मार्गदर्शक म्हणून धोनी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघासोबत जाईल. धोनीच्या निवडीने त्याच्या चाहत्यांनाही मोठा आनंद झाला आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर धोनी ट्रेंड करत होता. त्यातच, माजी क्रिकेटर वसीम जाफरने केलेलं ट्विटही लक्षवेधी ठरतंय.
यूएई व ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगेल. बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले की, ‘या स्पर्धेसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शन (मेंटॉर) असेल. मी त्याच्याशी दुबईत चर्चा केली होती. त्याने केवळ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी मार्गदर्शक राहण्यास सहमती दर्शवली. याबाबत कर्णधार व उपकर्णधारांनीही सहमती दर्शवली आहे.’, असेही शाह यांनी सांगितले. धोनीच्या या निवडीनंतर धोनीचे कमबॅक झाल्याने चाहत्यांना अत्यानंद झाला आहे. माजी क्रिकेटर वसीम जाफरने धोनीच्या सिलेक्शनवर मजेशीर ट्विट केलंय. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीला सरप्राईज एँट्री मिळाल्यानंतर.. असे ट्विट करत सुपरस्टार रजनीकांतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, रजनीकांत फोनवर बोलत असून क्यूँ हिला डाला ना... असे कॅप्शनही आहे. त्यामुळे, रजनीकांतचा एकच कॉल अन् सगळच सॉल्व, असं मजेशीर ट्विटर वसीम जाफरने केलं आहे.
धोनीच्या अनुभवाचा फायदा संघाला
अद्याप कर्णधार म्हणून कोहलीला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा जिंकण्याचा दांडगा अनुभव असलेल्या धोनीच्या अनुभवाचा फायदा कोहलीला होईल. धोनी सध्या यूएईमध्ये चेन्नई सुपरकिंग्जसोबत आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे.
मिळणार ‘कूल’ मार्गदर्शन
गेल्यावर्षी १५ ऑगस्ट क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झालेला महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा भारतीय संघासोबत दिसेल. यावेळी तो संघाचा मार्गदर्शक म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सहकार्य करेल. धोनीच्या नेतृत्त्वात अनेक खेळाडूंची कारकिर्द बहरली असल्याने, धोनीचे मार्गदर्शन भारतीय संघासाठी दडपणाच्या स्थितीत अत्यंत मोलाचे ठरेल.