इंदूर : भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान ईडन गार्डन्सवर २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाºया दुसºया कसोटी सामन्यादरम्यान प्रथमच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा वापर होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असून एसजीचा गुलाबी चेंडू अधिकृतपणे खेळविला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाने इंदूरमध्ये गुलाबी चेंडूने सराव केला. त्यामुळे या गुलाबी चेंडूबरोबर खेळण्यात कोणीतीही समस्या जाणवू शकते, यावर भाराताचा कर्णधार विराट कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.
विराट म्हणाला की, " आतापर्यंत आम्ही लाल चेंडूने कसोटी क्रिकेट खेळलो आहोत. पण आता कोलकातामध्ये आम्हाला गुलाबी चेंडूने खेळावे लागले आहे. पिंक बॉल हा लाल चेंडूपेक्षा जास्त स्विंग होतो. त्यामुळे थेट कोलकातामध्ये खेळणे सोपे नव्हते. गुलाबी चेंडूने खेळताना आम्हाला जास्त दक्षता घ्यावी लागेल."
पुजारा म्हणाला, ‘मी यापूर्वी दुलिप ट्रॉफी स्पर्धेत गुलाबी चेंडूने खेळलो आहे. तो चांगला अनुभव होता. स्थानिक क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव लाभदायक ठरू शकतो.’ अनेक क्रिकेटपटू आपल्या कारकिर्दीत प्रथमच गुलाबी चेंडूने खेळणार आहे, पण पुजारा, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी आणि कुलदीप यादव यांच्यासारख्या खेळाडूंना दुलिप ट्रॉफीमध्ये कुकाबुराच्या गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव आहे.पुजारा पुढे म्हणाला,‘दिवसा खेळताना कुठली अडचण भासणार नाही, पण सूर्यास्ताच्यावेळी व प्रकाशझोतामध्ये अडचण भासू शकते. सूर्यास्ताच्या वेळचे सत्र अधिक महत्त्वाचे राहील. फलंदाज म्हणून माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे, पण मी ज्यावेळी अन्य खेळाडूंसोबत चर्चा केली त्यावेळी त्यांच्या मते लेग स्पिनरविरुद्ध खेळणे आणि त्यांचा गुगली चेंडू समजणे कठीण होते.’उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या मते परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा प्रश्न उपस्थित होतो, पण सामन्यापूर्वीचा सराव महत्त्वाचा राहील. रहाणे म्हणाला,‘मी याबाबत उत्सुक आहे. हे एक नवे आव्हान राहील. परिस्थिती कशी राहील, हे आताच सांगता येत नाही. सामना खेळण्यानंतरच त्याची कल्पना येईल. सामन्यापूर्वी दोन-तीन सराव सत्रात आम्हाला गुलाबी चेंडू किती स्विंग होतो आणि प्रत्येक सत्रात त्यात काय बदल होतो, याची माहिती मिळेल. चेंडू उशिरा आणि शरीरासमिप खेळणे महत्त्वाचे ठरेल. गुलाबी चेंडूसोबत ताळमेळ साधण्यास विशेष अडचण भासणार नाही, असे वाटते.’