भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केलेल्या करारातून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळले. बीसीसीआयनं ऑक्टोबर 2019 आणि सप्टेंबर 2020 या कालावधीसाठीची सेंट्रल करार यादी जाहीर केली. बीसीसीआयनं ए + गटात विराट कोहली, रोहीत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंनाच स्थान दिले आहे. या तिघांव्यतिरिक्त बीसीसीआयनं 27 खेळाडूंना सेंट्रल करारात समाविष्ट करून घेतले. पण, यात धोनीचे नाव नसल्यानं पुन्हा त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला. गतवर्षी धोनीचा ए ग्रेडमध्ये समावेश होता, परंतु यावेळी त्याला सी ग्रेडमध्येही स्थान दिलेले नाही. हा धोनी पर्वाचा अंत समजावा का? बीसीसीआयच्या या सेंट्रल कराराचा नक्की अर्थ काय?
बीसीसीआयचा वार्षिक करार आणि धोनीची निवृत्ती याचा काही संबंध आहे का?
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचा निर्णय हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कचेरीत आहे. या तिघांची मागील काही दिवसांची वक्तव्य नीट ऐकल्यास धोनी आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळेल हे निश्चित आहे. शास्त्रींनी नुकतंच सांगितलं आहे की, याबाबत ते धोनीशी चर्चा करणार आहेत. हेच मत गांगुलीनं व्यक्त केलं होतं. शास्त्री यांनी धोनी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल, असेही भाकीत केले होते, त्याचवेळी त्यांनी ट्वेंटी-20 क्रिकेट खेळेल असेही म्हटले होते. त्यामुळे शास्त्री आणि गांगुली यांचे विधानाचा विचार केल्यास बीसीसीआयच्या सेंट्रल कराराचा आणि धोनीच्या निवृत्तीचा संबंध नसल्याचे स्पष्ट होईल.
धोनी अजूनही टीम इंडियासाठी खेळू शकतो का?
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो सैन्यदलाच्या सेवेतही रुजू झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या धोनीला सेंट्रल करारातून वगळण्यात आले. पण, धोनी अजूनही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकतो. त्यासाठी त्याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. आयपीएलमध्ये धोनीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
खेळाल तेवढेच मानधन...
धोनीला सेंट्रल करार न देऊन बीसीसीआयनं जेवढे सामने खेळाल, तेवढंच मानधन मिळेल असे संकेत दिले आहेत. धोनीनं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्ती घेतल्यास त्याला त्याचा हिस्सा मिळेल. पण, या करारानुसार धोनी पर्वाचा शेवट जवळ आला हे मात्र निश्चित.
Web Title: What does no BCCI Annual Contract mean for MSD?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.