नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. यासाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचा समावेश आहे. अशातच ओमानचा फलंदाज जतिंदर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे चाहत्यांना किंग कोहलीची आठवण झाली आहे.
खरं तर ओमानच्या फलंदाजाची बॅट आपोआप कोणत्याही आधाराशिवाय जमिनीवर उभी असल्याचे दिसत आहे. चाहते याला जादू म्हणत आहेत, मात्र इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जो रुटने जतिंदर सिंगच्या आधी मैदानावर अशी जादू करून दाखवली होती. त्यावेळी विराट कोहलीनेही असाच प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नव्हते. मात्र ही कोणत्याही प्रकारची जादू नसून जो रूट आणि जतिंदर सिंग यांच्या बॅटचा तळ सपाट आहे. त्यामुळे बॅट कोणत्याही आधाराशिवाय उभी राहिली. परंतु विराट आणि इतर खेळाडूंची बॅट खालून थोडी वक्र आहे, त्यामुळे रूट आणि जतिंदर सिंगने जे काही केले ते विराट किंवा इतर खेळाडूंना करता आले नाही.
किंग कोहलीचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल इंग्लिश फलंदाज जो रूटचा व्हिडीओ पाहून विराट कोहलीला देखील धक्का बसला होता. या घटनेनंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने स्वतः मैदानावर फलंदाजी करताना आपल्या बॅटचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही आणि त्याची बॅट पडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
ओमानने जिंकला सामना अलीकडेच ओमान आणि सौदी अरब यांच्यात सामना पार पडला. ओमानने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला. टी-२० मालिकेतील सातव्या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सौदी अरबच्या संघाने २० षटकांत केवळ ११४ धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानच्या संघाने १२.४ षटकांत ही धावसंख्या गाठली. जतिंदर सिंगने २४ चेंडूत ३५ धावांची शानदार खेळी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"