मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने काही दिवसांपूर्वी दानिश कनेरियाबाबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. अख्तरच्या या विधानानंतर चांगलाच वाद रंगला. पण अख्तरने यावेळी नेमके काय सांगितले होते, याबाबत अद्याप बऱ्याच जणांना माहिती नाही. त्यामुळे अख्तर कनेरियाबरोबर झालेल्या अन्याबद्दल काय म्हणाला, या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.
सध्याच्या घडीला भारतामध्ये नागरीकत्वाचा मुद्दा गाजतो आहे. त्याचबरोबर देशातील अल्पसंख्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. पण पाकिस्तानमध्ये हिंदू असलेल्या अल्पसंख्यांकावर कसा अन्याय केला जात होता, हे अख्तर आपल्या वक्तव्यातून मांडले आहे.
अख्तर म्हणाला की, " कनेरियाने आम्हाला बरेच सामने जिंकवून दिले, पण याबद्दल त्याचे अभिनंदन केले जायचे नाही. संघाच्या कर्णधाराला तर कनेरियाने आपल्याबरोबर जेवणही करू नये, अशी भूमिका घेतली होती. कनेरिया आपण जिथून जेवण घेतो, तिथून का घेतो? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावेळी मी त्या कर्णधाराला चांगलेच धारेवर धरले होते. पण कनेरियावर संघातील खेळाडूंनी अन्याय केला, ही गोष्ट खोटी नाही."
मला हिंदू असल्याचा गर्व आहे; दानिश कनेरियाने मांडली आपली ठाम भूमिका
हिंदू असल्यामुळे माझ्यावर पाकिस्तानच्या खेळाडूंनी अन्याय केला, असे मत फिरकीपटू दानिश कनेरियाने मांडले होते. आता, मला हिंदू असल्याचा गर्व आहे, अशी ठाम भूमिका कनेरियाने मांडली आहे.
कनेरिया म्हणाला की, " मी हिंदू असूनही पाकिस्तानच्या संघातून खेळलो. त्यामुळे मला हिंदू असल्याचा गर्व आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने मला १० वर्षे खेळण्याची संधी दिली. पण खेळाडूंनी मात्र माझ्यावर नेहमीच अन्याय केला. पाकिस्तानच्या खेळाडूंनी मला नेहमीच सापत्न वागणूक दिली."
कनेरिया पुढे म्हणाला की, " पाकिस्तानचे खेळाडू माझ्या पाठीमागे टीका करायचे. माझ्याबद्दल काहीही बोलायचे. पण मी त्यांच्याकडे कधीही लक्ष दिले नाही. मी नेहमीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आलो. कारण माझे लक्ष क्रिकेटवर आणि संघाला विजय मिळवून देण्यावर असायचे. पाकिस्तानमधील बऱ्याच लोकांनी माझे समर्थन केले आहे, मी त्यांचा कायम ऋणी राहीन."
दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या मीठाला जागलाच नाही; जावेद मियाँदाने केली जळजळीत टीकापाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया हा हिंदू होता, म्हणून त्याच्यावर अन्याय करण्यात आला, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी माजी गोलंदाज शोएब अख्तरने केले होते. त्यानंतर या गोष्टीवर भरपूर वाद झाला. पण आता पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी कनेरियावर जोरदार टीका केली आहे.
मियाँदाद यांनी सांगितले की, " कनेरियाबद्दल जे काही सुरु आहे ते घृणास्पद आहे. कनेरिया पाकिस्तानच्या मीठाला जागलेला नाही. कारण कनेरिया जे म्हणतोय ते साफ खोटे आहे. जर कनेरिया हा हिंदू होता आणि त्याच्यावर पाकिस्तानने अन्याय केला तर त्याला संघात स्थानच मिळाले नसते. कनेरियावर अन्याय झाला असेल तर तो दहा वर्षे संघाकडून कसा खेळला असता?"
मियाँदाद पुढे म्हणाले की, " कनेरिया आणि शोएब अख्तर हे सध्या संघात नाहीत. ते निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा बोर्डाशी काहीही संबंध नाही. पण बोर्डाने धर्मावरून कधीही अन्याय केला नाही. त्यामुळे या दोघांच्या वक्तव्याला किती प्रसिद्धी द्यायची आणि त्यावर किती चर्चा करायची, हे ठरवायला हवे."