अबुधाबी : बऱ्याच काळापासून घरापासून लांब राहिल्याने निर्माण झालेल्या मानसिक थकव्यामुळे काही निर्णय चुकू शकतात, असे मत भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले. त्याने अफगाणिस्तानवरील विजयानंतर हे मत व्यक्त केले.
रोहितने सांगितले की, या सामन्यात आधीच्या सामन्यांपेक्षा चांगला खेळ केला. जर पहिल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही असे खेळू शकलो असतो तर चांगले झाले असते. बराच काळ घरापासून लांब राहिल्यानंतर असे होऊ शकते. अनेक वेळा निर्णय चुकतात. आधीच्या दोन्ही सामन्यांत असेच झाले.
रोहितने सांगितले की, सध्या आम्ही खूप क्रिकेट खेळत आहोत. अशात जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी तुम्ही मानसिकरीत्या ताजेतवाने असायला हवे. हेच कारण आहे की आम्ही काही चांगले निर्णय घेऊ शकलो नाही. खूप क्रिकेट खेळल्यानंतर असे होते. दोन खराब सामन्यानंतर संघ खराब होत नाही. त्यावर संघात आत्मचिंतन करून पुनरागमन केले जाते. आम्हीही असेच केले आहे.