नवी दिल्ली : भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेला विजय क्रिकेट इतिहासात नेहमी स्मरणात राहील. ऋषभ पंतने नाबाद ८९ धावांची खेळी करताना ३२९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करीत ऐतिहासिक विजय मिळवला. १९८८ नंतर ऑस्ट्रेलियाला या मैदानावर प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरचा फटका मारला त्यावेळी काय घडले, याबाबत पंतने सांगितले.
चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत भारतापुढे पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर शुभमन गिलने ९१ तर पुजाराने ५६ धावा केल्या. त्यानंतर पंतने १३८ चेंडूंना समोरे जाताना नाबाद ८९ धावांची खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. ही लढत जिंकत भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर २-१ ने कब्जा केला. पंत म्हणाला, वेगाने पळत होतो. पहिली धाव घेताना डोळे बंद केले होते आणि पळत सुटलो. ज्यावेळी दुसरी धाव घ्यायला लागतो त्यावेळी माझ्या लक्षात आले की मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करीत नाही.
मला आश्चर्य वाटले की, क्षेत्ररक्षक पळत का नाही. त्यानंतर माझ्या लक्षात आले की चेंडू सीमारेषेकडे जात आहे आणि मला पुन्हा आनंद झाला. मी ओरडत होतो सैनी तीन, आपल्याला तीन धावा घ्यायच्या आहेत. सैनी एका पायाने लंगडत धावत होता, ही खरच गंमत होती.’
‘ज्यावेळी मी शेवटचा फटका खेळला त्यावेळी मला वाटले की चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला आहे. बाह्य मैदान स्लो होते. त्यामुळे चेंडू त्या दिशेला जात असताना मी नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या सैनीला म्हटले की तीन धावा दोन धावा नव्हे... तीन धावा घ्यायच्या आहेत. त्याच्या स्नायूच्या दुखापतीबाबत माझ्या डोक्यात विचारही आला नाही.