बँकॉक : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाल्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये शोककळा पसरली. थायलंडमधील कोह सामुई येथील व्हिलामध्ये वयाच्या ५२व्या वर्षी वॉर्नने जगाचा निरोप घेतला. यावेळी त्याच्यासोबत चार मित्र होते. या मित्रांनी शेन वॉर्नला मृत्यूच्या दाढेतून सोडविण्यासाठी वीस मिनिटे प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याची माहिती पुढे आली आहे.
शेन वॉर्नचा मृत्यू झाला, त्यावेळी नेमके काय घडले, याची माहिती थायलंडमधील बो पूट येथील पोलीस अधिकारी चॅटचाविन नाकमुसिक यांनी दिली. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई येथील व्हिलामध्ये चार मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी संध्याकाळी शेन वॉर्न जेवणासाठी उठलाच नाही. त्याची चौकशी करण्यासाठी एक मित्र शेन वॉर्नकडे गेला. मात्र, शेन वॉर्न शुद्धीवर नसल्याचे त्याला समजले. त्यानंतर, शेन शुद्धीत यावा, म्हणून त्याच्यावर सीपीआर करण्यात आला. यामध्ये त्या मित्रांना यश आले नाही.
शेन वॉर्नला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मित्रांनी रुग्णवाहिका बोलावली होती. मित्रांनी रुग्णालयाला माहिती दिल्यानंतर कोह सामुई येथील शेन वॉर्नच्या व्हिलावर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम दाखल झाली होती. या टीमनेही वॉर्नला १०-२० मिनिटे सीपीआर दिला. त्यानंतर, थाई आंतरराष्ट्रीय रुग्णालयाची एक रुग्णवाहिका आली. या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनीही पाच मिनिटांसाठी शेन वॉर्नला सीपीआर दिला. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले आणि अखेर शेन वॉर्नचे निधन झाले, अशी माहिती चॅटचाविन या पोलीस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियाचे विदेशमंत्री मॅरिस पायने यांनी शेन वॉर्नच्या मित्रांसोबत संवाद साधला.
एमसीजीच्या स्टँडला वॉर्नचे नावया महान खेळाडूच्या स्मृतिप्रीत्यर्थ मेलबोर्न क्रिकेट मैदानाच्या दक्षिणेकडील एका स्टँडला शेन वॉर्नचे नाव देण्याचा निर्णय एमसीजीच्या समितीने घेतला. वॉर्नने ७००वा बळी एमसीजीवर घेतला होता. या स्टेडियमबाहेर वॉर्नचा पुतळा आधीपासूनच उभारण्यात आला आहे. वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी चाहते पुष्पगुच्छ, क्रिकेट चेंडू, बीअर, सिगारेट, आदी वस्तू पुतळ्याच्या पायथ्याशी ठेवत होते. व्हिक्टोरिया स्टेडियमच्या एका स्टँडला वॉर्नचे नाव दिले जाण्याचा विचार असल्याचे मॉरिसन यांनी सांगितले.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कारशेन वॉर्नचे क्रिकेटमधील योगदान लक्षात घेत त्याच्यावर ऑस्ट्रेलियात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. याबाबत कुटुंबीयासोबत चर्चा करण्यात येणार येईल, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी केली.