India vs Sri Lanka T20 Records: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७ वाजता हा सामना रंगणार आहे. ही ३ टी२० सामन्यांची मालिका असून पल्लेकलच्या मैदानात २७, २८ आणि ३० जुलैला हे टी२० सामने रंगणार आहेत. ही मालिका भारतीय क्रिकेटसाठी खास आहे. सूर्या-गंभीर जोडी पहिल्यांदाच मैदानात- या मालिकेच्या माध्यमातून सूर्यकुमार यादव - गौतम गंभीर ही नवी कर्णधार - कोच जोडी आपल्या सर्वोकृष्ट ११ खेळाडूंना मैदानात उतरवेल. ते ११ खेळाडू कोण असतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याआधी शेवटचा भारत-श्रीलंका सामना कधी झाला होता? त्यात कोण जिंकलं होतं? हे तुमच्या लक्षात आहे का? चला जाणून घेऊया.
भारत आणि श्रीलंका हे दोन शेवटच्या वेळी श्रीलंकेत ७ जानेवारी २०२३ मध्ये टी२० सामना खेळले होते. भारताकडून राहुल त्रिपाठीने तिसऱ्या क्रमांकावर येऊन १६ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत तुफानी ११२ धावांची नाबाद खेळी केली होती. यासोबतच शुबमन गिलने देखील ४६ धावा केल्या होत्या. या फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ५ बाद २२८ धावा कुटल्या होत्या.
या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी ४४ धावांची भागीदारी केली होती. पण त्यानंतर त्यांच्या फलंदाजांना फटकेबाजी सुरु ठेवता आली नव्हती. १० षटकांनंतर त्यांची धावसंख्या २ बाद ९१ इतकी होती. उर्वरित १० षटकात त्यांनी अपेक्षित धावगती गाठता आली नाही. दासून शनाकाने २३ धावांची फटकेबाज खेळी केली. पण अखेर भारताच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेला फारशी मोठी झेप घेता आली नाही. त्यांचा डाव १६.४ षटकात १३७ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने तब्बल ९१ धावांनी सामना जिंकला होता.