आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात हार्दिक पांड्याची पुन्हा एंट्री झाल्याने संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह नाराज झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद आपल्याकडे येईल, अशी आशा असणाऱ्या बुमराहला हार्दिक पांड्याच्या घरवापसीने धक्का बसल्याचं बोललं जात आहे. अशातच भारताचे माजी सलामीवीर आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष के. श्रीकांत यांनीही यावर भाष्य केलं असून हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेऊन त्याला भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करण्याच्या मुंबई इंडियन्सच्या रणनीतीमुळे जसप्रीत बुमराह नाराज झाला असू शकतो, असं श्रीकांत यांनी म्हटलं आहे.
जसप्रीत बुमराह याने इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट टाकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कधी-कधी शांत राहणं हेच सर्वांत चांगलं उत्तर असतं, असं बुमराहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. बुमराहच्या या पोस्टनंतर तो मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर नाराज झाल्याचं बोललं जाऊ लागलं. कारण मुंबई इंडियन्स संघातूनच २०१५ साली बुमराहचं आयपीएल पदार्पण झालं होतं. तेव्हापासून आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर त्याने अनेक सामन्यांत संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. तसंच रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळेल, अशी त्याला आशा असल्याची चर्चा सुरू होती. मात्र गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेऊन रोहित शर्मानंतर त्याला कर्णधार करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बुमराहच्या नाराजीची चर्चा असताना के. श्रीकांत यांनी या सगळ्या प्रकरणावर थेट भाष्य केलं आहे.
कोणालाही दु:ख होणं साहजिक, काय म्हणाले के. श्रीकांत?
जसप्रीत बुमराहच्या नाराजीच्या चर्चेवर बोलताना के. श्रीकांत यांनी आपल्या यू ट्यूब व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "तुम्हाला बुमराहसारखा खेळाडू मिळणार नाही. कारण कसोटी, वनडे आणि टी-ट्वेंटीमधील तो सध्याच्या घडीचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. तो बऱ्याच काळापासून मुंबई इंडियन्ससोबत राहिला. मात्र संघातून गेलेल्या आणि आता परत आलेल्या खेळाडूच्या स्वागताकडे संघ व्यवस्थापनाचं जास्त लक्ष आहे. त्यामुळे कोणताही खेळाडू नाराज होणं साहजिक आहे."
जडेजासोबत तुलना
के. श्रीकांत यांनी आता जसप्रीत बुमराहसोबत झालेल्या प्रकाराची तुलना चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू रवींद्र जडेचा याच्यासोबत केली आहे. "असाच काहीसा प्रकार सीएसकेमध्ये जडेजासोबत झाला होता. मात्र संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने चर्चा करून यामधून मार्ग काढला होता. मुंबई इंडियन्सही बुमराह, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या तिघांसोबत चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन," असा विश्वास के. श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे.