भारतामध्ये खेळवण्यात येत असलेली आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आणि १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमने सामने येणार आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत एकही सामना टाय झालेला नाही. दरम्यान, उपांत्य आणि अंतिम फेरीमध्ये एखादा सामना टाय झाल्यास त्याचा निकाल कसा लावला जाणार याबाबतची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. मात्र यावेळी वर्ल्डकपच्या उपांत्य किंवा अंतिम सामन्यात मागच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात दिसला त्याप्रमाणे बाउंड्री काउंटसारखा वादग्रस्त नियम दिसणार नाही.
गेल्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला अंतिम सामना कमालीचा रोमांचक झाला होता. तसेच हा सामना टाय झाला होता. तसेच त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्येही हा सामना टाय राहिला होता. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिली सुपर ओव्हर होती. अखेरीस बाऊंड्री काउंटच्या जोरावर इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आले होते. मात्र त्यावरून खूप वाद झाला होता. त्यानंतर आयसीसीने हा नियम ऑक्टोबर २०१९ मध्ये हटवला होता.
म्हणजेच यावेळी उपांत्य किंवा अंतिम सामना टाय झाल्यास बाउंड्री काउंटद्वारे निकाल लागणार नाही. तर सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवली जाईल. तसेच सुपर ओव्हर टाय झाल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवली जाईल. तसेच जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हरचा क्रम सुरू राहील. त्यामुळे आता कुठलाही सामना टाय झाल्यास सामन्यातील रोमांच दुप्पट होणार आहे.