- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)
वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने खूप मोठ्या फरकाने जिंकला. याहून मोठा विजय आतापर्यंत भारताने कधी मिळविला नव्हता. या विजयासाठी भारतीय संघाचे सर्वप्रथम अभिनंदन करतो, पण ज्या लढवय्या आणि चुरशीच्या खेळाची अपेक्षा होती, तसा खेळ झाला नाही. दोन्ही डावांमध्ये विंडिज संघ कोलमडला. पहिल्या कसोटीत कर्णधार जेसन होल्डर खेळला नाही आणि त्यांच्या गोलंदाजीत कोणतीच धार दिसली नाही. सर्वच गोलंदाज कमजोर दिसले. तीन दिवसांत हा सामना संपला, यावरून ही लढत किती एकतर्फी झाली हे दिसून येते. त्यामुळेच ज्या तयारीची अपेक्षा भारतीय संघाने केली, ती त्यांना करता आली नाही. एक बाब नक्की की, काही उगवते तारे पुढे आले. पृथ्वी शॉ, रिषभ पंत चमकले. जडेजाने छाप पाडली, तसेच गोलंदाजही फॉर्ममध्ये दिसले, ही भारतासाठी सकारात्मक बाब ठरली, पण जी तयारी एका तगड्या लढतीसाठी आवश्यक असते. ती मात्र, भारताला करता आली नाही.भारताला तयारीसाठी आवश्यक लढत मिळाली नाही, ही माझी तक्रार नाही, पण माझी मुख्य तक्रार आहे की, वेस्ट इंडिज क्रिकेटला झालेय तरी काय? मी जेव्हा कसोटी क्रिकेट पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा म्हणजे साधारण १९६४-६५ सालची गोष्ट. तेव्हा मी ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध भारत हा सामना पाहिला होता. त्या वेळी विंडिज संघात गारफिल्ड सोबर्स, रोहन कन्हाय, कॉनराइड हंट, क्लाइव्ह लॉइड, डेव्हिड हॉलफॉल्ड, बुचर, जॅकी हेन्रीक्स, बेज हॉल्स, चार्ली ग्रिफीथ, लॅन्स गिब्स यासारखे दिग्गज खेळाडू होते. शिवाय त्यांच्या संघात दिग्गज खेळाडूंची एक परंपरा राहिली आहे. त्यानंतरही या संघातून अनेक महान खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले. व्हिव्ह रिचर्ड्स, गॉर्डन ग्रिनिज, माल्कम मार्शल, अँडी रॉबटर््स, मायकल होल्डिंग कोणाकोणाची नावे घेऊ... ब्रायन लारा ज्याने सचिनसोबतचा काळ गाजवला, पण आता या मोठा इतिहास आणि परंपरा असलेल्या विंडीज संघाला नेमके झालेय काय हेच कळत नाही. अशा दिग्गज खेळाडूंच्या संघाची आजची अवस्था पाहून खूप दु:ख होते. विंडीज संघ टी२० क्रिकेटमध्ये नक्कीच मजबूत आहे, तिथे ते विश्वविजेते आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांची कामगिरी वाईट नाही, पण कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १०-१५ वर्षांतील त्यांची कामगिरी पाहिली, तर ती खूप वाईट असल्याची दिसेल आणि याचेच सर्वाधिक दु:ख वाटते.यावर आता उपाय काढावाच लागेल. क्रिकेट ८-१० देशांमध्ये खेळला जातो आणि वेस्ट इंडिज एक देश नसून, जवळच्या बेटांचा मिळून तयार झालेला समूह आहे आणि इथेच मुख्य अडचण असल्याचे दिसत आहे. बाकी खेळ प्रत्येक देश स्वतंत्रपणे खेळतो, पण क्रिकेटच्या बाबतीत हे देश वेस्ट इंडिजच्या ध्वजाखाली एकत्र येऊन खेळतात, याशिवाय वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना सांभाळू शकलेले नाही. ख्रिस गेल, द्वेन ब्रावो, सुनील नरेन, आंद्रे रसेल असे खेळाडू सध्या संघाबाहेर असून, यांच्या उपस्थितीने नक्कीच विंडिज संघामध्ये फरक पडला असता. खेळाडू आणि बोर्ड यांच्यात जो वाद सुरू आहे, त्याचा मोठा फटका विंडीज क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसत आहे. यामध्ये आयसीसीसह बीसीसीआय, आॅस्टेÑलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यासारख्या मोठ्या क्रिकेट बोर्डनेही हस्तक्षेप करायला हवा.