मतीन खान
स्पोर्ट्स हेड-सहायक उपाध्यक्ष, लोकमत समूह
गुरुवारी भारताच्या यजमानपदाखाली १३व्या वन डे विश्वचषकाचा श्रीगणेशा होणार आहे. क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोण बनेल चॅम्पियन? हा सर्वांत मोठा प्रश्न...दिग्गज सुनील गावसकर इंग्लंडला जेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार मानतात तर घरच्या मैदानावर अनेक चाहते संभाव्य चॅम्पियन म्हणून भारतीय संघाकडे पाहतात.
मागच्या महिन्यात आशिया कप सुरू होण्याआधी चाहत्यांच्या मनात एकच चिंता होती ती ही की, आमची मधली फळी २०१९च्या विश्वचषकासारखीच कमकुवत सिद्ध होईल? आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच लढतीत शाहीन आफ्रिदी-हारिस रौफ यांच्या वेगवान माऱ्यापुढे रोहित, विराट, शुभमन आणि शेयस माघारी परतले तेव्हा ही बाब सिद्ध होत असल्याचे चित्र होते. ४ बाद ६६ अशी अवस्था होताच विश्वचषकाआधीच पाकिस्तानकडून पराभूत होण्याची भीती चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती.
त्याचवेळी टीम इंडियाने मुसंडी मारली. ईशान-हार्दिक या जोडीने १३८ धावांची भागीदारी करताच आत्मविश्वास संचारला. त्यानंतर संघाने मागे वळून पाहिलेच नाही. दुसऱ्या सामन्यात विराट- लोकेश राहुल यांच्या शानदार नाबाद शतकांमुळे ३५६ धावांचा डोंगर उभारता आला. या ओझ्याखाली पाकचा संघ सपशेल दबला. राहिलेली कसर कुलदीप यादवने पूर्ण केली. त्याने अर्धा संघ गारद करीत भारताला २२८ धावांनी विजय मिळवून दिला.
खरेतर येथूनच सुखद कथानकाची सुरुवात झाली. ज्याला संधी मिळाली, त्याने कामगिरीत कमाल केली. बुमराहच्या यशस्वी पुनरागमनामुळे गोलंदाजीत पर्याय उपलब्ध झाला. त्याची उपस्थिती संघाला बळ देणारी ठरते. सिराजने आशिया कपच्या फायनलमध्ये ६ गडी बाद करताच तो आयसीसी रॅंकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला. कुलदीप आशिया कपमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीत पहिल्या वन डेत ५ गडी बाद केले, तर दुसरीकडे अश्विनने स्वत:च्या अनुभवी गोलंदाजीने प्रभावित केले. या सर्वांची कामगिरी निवडकर्त्यांसाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली.
पाच गोलंदाजांसह खेळणे आणि त्यात दोन फिरकीपटू तसेच तीन वेगवान गोलंदाज, असे समीकरण बनू शकेल. हार्दिक हा सहावा गोलंदाज संघाकडे पर्याय असेल. अशावेळी शार्दुल ठाकूरला शमीसारख्या विश्वस्तरावरील वेगवान गोलंदाजाच्या तुलनेत झुकते माप देणे सार्थ ठरेल? कुलदीपही शानदार गोलंदाजी करीत असल्याने अश्विनसारखा दिग्गज बाकावर बसेल?
फलंदाजीत फॉर्ममध्ये असलेले रोहित, शुभमन,विराट, राहुल, श्रेयस आणि हार्दिक हे संघात असतीलच. मग प्रश्न असा की उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला डावखुरा ईशान किशन याला बाहेर बसावे लागेल? टी-२० त नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव याचेही स्थान अनिश्चित वाटते. इंदूर वन डेत त्याने ३७ चेंडूत ६ षटकारांसह ७२ धावा ठोकल्या. या खेळीत कॅमेरून ग्रीनला मारलेल्या सलग चार षटकारांचाही समावेश आहे. अशा धडाकेबाज फलंदाजाला अंतिम संघात स्थान न मिळू शकणे टीम इंडियात ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी’चे उत्कृष्ट उदाहरण आहे.
ऐन विश्वचषकाच्या तोंडावर खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये असणे भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी आनंददायी ठरते.. त्यातच ऑस्ट्रेलिया संघाचे ‘भारतीय संघच विश्व विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे’, असे म्हणणे आनंदात भर टाकणारे आहे. मात्र तरीही भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी आपला फॉर्म १९ नोव्हेंबर कायम राखायला हवा, तरच भारत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकू शकेल.
मुद्द्याची गोष्ट : गुरुवारी भारताच्या यजमानपदाखाली 13 व्या वन डे विश्वचषकाचा श्रीगणेशा होणार आहे.
क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोण बनेल चॅम्पियन? हा सर्वांत मोठा प्रश्न...
दिग्गज सुनील गावसकर इंग्लंडला जेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार मानतात, तर घरच्या मैदानावर अनेक
चाहते संभाव्य चॅम्पियन म्हणून भारतीय संघाकडे पाहतात. पण भारतीय संघात वेगळीच समस्या आहे...
Web Title: What is the problem of Team India?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.