क्रिकेट मॅचवेळी फॅन्स त्यांच्या आवडत्या खेळाडू आणि टीमला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडिअमच्या प्रेक्षक गॅलरीत हजर असतात. ग्राऊंडवर चौकार-षटकारांची आतषबाजी झाल्यास काही जण खूप उत्सुक होतात आणि ग्राऊंडच्या काही नियमांना फाटा देत थेट ग्राऊंडवर पोहचतात. अलीकडच्या काळात ग्राऊंडवर मॅच सुरू असताना एखादा फॅन्स त्याच्या आवडत्या खेळाडूला भेटायला मैदानात येतो हे दिसून येते. जर तुम्हालाही हे इतके सहज सोपे वाटत असेल तर सतर्क राहा कारण बळजबरीने ग्राऊंडवर घुसखोरी करणाऱ्या फॅन्ससाठी कठोर नियम आहेत. त्यासाठी काय शिक्षा आहे हे जाणून घेऊया.
२६ मार्चला राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सचा सामना गुवाहाटी येथे खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचे बॅट्समन धावांचा पाठलाग करत होते. त्यावेळी अचानक एक अज्ञात युवक मैदानात घुसला आणि त्याने राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन रेयान परागचे पाय धरले, त्यानंतर मिठी मारली. या काळात काही काळ मॅच थांबली होती. त्यानंतर मैदानातील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत युवकाला बाहेर काढले.
मागील काळापासून फॅन्सकडून बेकायदेशीरपणे ग्राऊंडवर घुसून आवडत्या खेळाडूला भेटण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. हे कृत्य करताच तातडीने सुरक्षा रक्षकांकडून कारवाई केली जाते परंतु केवळ ग्राऊंडवरून त्यांना बाहेर काढून कारवाई संपते का..? तर असं नाही. अशा फॅन्सना जेव्हा पकडले जाते तेव्हा त्यांच्यावर कारवाई होती. ICC या कृत्यावर माफी देत नाही. फॅन्स थेट मैदानात घुसणे हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक मानले जाते. त्यामुळे ज्या मैदानात हे कृत्य घडते तिथे ग्राऊंडला मायनस प्वाँईट दिला जातो. सलग ३ घटनानंतर त्या मैदानावर बंदी आणली जाते.
फॅन्सला काय शिक्षा होते?
संबंधित फॅन्सला ग्राऊंडच्या बाहेर काढले जातेच परंतु त्याने सातत्याने हे कृत्य केले तर त्याला आयुष्यभर स्टेडिअमवर येण्यास बंदी घातली जाते. काही प्रकरणात ५ ते १० वर्षाच्या बंदीची तरतूद आहे. अनेक देशात हे कृत्य केल्यास आर्थिक दंड भरावा लागतो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या देशात हा दंड हजारो डॉलरचा आहे. काही देशात सहा महिने जेलपर्यंतची शिक्षा आहे.
भारतातही आहेत कठोर नियम
बीसीसीआयनेही हे कृत्य करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. या घटना होऊ नयेत यासाठी स्टेडिअम प्रशासनाला कठोर निर्देश दिलेत. भारतात जर कुणी असे कृत्य करत असेल तर त्याच्याविरोधात IPC कलम ४४७ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन शिक्षा सुनावली जाते.