पोर्ट ऑफ स्पेन : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडीजसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध धावा केल्याचा काय उपयोग? जे विश्वचषकातसुद्धा पात्र होऊ शकले नाहीत, अशा संघाविरुद्ध तुम्ही धावा करून निवड समितीला काय सांगू इच्छित आहात? भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली; पण ही मोठी उपलब्धी नाही, या शब्दांत दिग्गज सुनील गावसकर यांनी कोहली आणि रोहित यांच्या निवडीमागील हेतू आणि दोघांच्या धावा यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वेस्ट इंडीज सध्या सर्वांत वाईट टप्प्यातून जात आहे. त्यांनी अनेक छोट्या संघांविरुद्ध सामने गमावले आहेत. त्यांच्याविरुद्ध कोहलीने ७६वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.
या मालिकेत तरुणांपेक्षा मोठ्या नावांना (वरिष्ठ खेळाडूंना) अधिक पाठिंबा मिळाल्याबद्दल गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. ‘तरुण खेळाडूंनी मोठ्या खेळाडूंना आव्हान द्यावे, असे निवडकर्त्यांना वाटत नाही का?’, असा परखड सवाल त्यांनी केला.
निवड समितीचे नवे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यपद्धतीत बदल होईल का, अशीही विचारणा करीत ते म्हणाले, ‘विंडीजच्या दुबळ्या आक्रमणाविरुद्ध रोहित आणि कोहलीच्या धावा काही प्रश्न निर्माण करतात. निवडकर्त्यांनी यातून काय शिकले? काही युवा खेळाडूंना आजमावून पाहणे आणि ते कसोटी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतात यावर योग्य तो निर्णय घेणे, असे निवड समितीला का वाटत नाही?’ भविष्यासाठी संघबांधणीच्या दृष्टिकोनात काही बदल होतो का बघूया. नाहीतर तीच जुनी कहाणी चालू राहील.’
Web Title: What is the use of Kohli, Rohit's runs against a weak team? Why don't the youth have a chance? : Sunil Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.