मतीन खानगेले काही दिवस भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने निराशाजनक राहिले. कारण भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज खेळाडूंचे वर्तन त्यांच्या लौकिकास साजेसे नव्हते. एक वेळ त्यांच्यातील व टीव्ही सिरियलमधील सासू-सुनांच्या रोजच्या भांडणामध्ये फारसा फरक जाणवला नाही.सर्वात आधी रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनविण्यात आले. त्यानंतर बातमी आली की, कोहलीला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्यासाठी केवळ ४८ तासांचा अवधी देण्यात आला होता. त्याने ही वेळ न पाळल्याने अखेर त्याला हटविण्यात आल्याचेही बोलले गेले. हा सगळा घटनाक्रम क्रिकेटच्या चाहत्यांसाठी निराशेचा ठरला. कारण विराटला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडावे लागेल, हे अनेकांना वाटत होते. मात्र ते अशा पद्धतीने काढून घेण्यात येईल, याची अपेक्षा नव्हती. त्यानंतर परत एक धक्का बसला, तो म्हणजे रोहितच्या दुखापतीचा. याच कारणाने तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर झाला. यादरम्यान कोहलीनेही एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेण्याबाबत बीसीसीआयला विनंती केल्याची बातमी आली. अखेर आज विराटने चुप्पी तोडत या सगळ्या गोष्टींवर भाष्य केले. पण एकप्रकारे या वादावर सारवासारव करण्याचा विराटचा प्रयत्न दिसला.हा घटनाक्रम सुरू असताना असे वाटत होते की, ज्याला जे हवे आहे, तो तसे वागतो आहे. विशेष म्हणजे या अहंकाराच्या लढाईत क्रिकेटलाच दावणीला बांधले गेले. बरं या सगळ्यात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींच्या भूमिकेतही कुठे तरी अहंकाराचा लवलेश दिसला.दोन वरिष्ठ खेळाडूंमधील वाद हा भारतीयांसाठी काही नवा नाही. याआधी गावसकर-बेदी, गावसकर-कपिल, युवराज-धोनी आणि आता कोहली-रोहित. सर्व वादाचा केंद्रबिंदू काय तर श्रेष्ठत्वाची लढाई. मला वाटतं या सर्वांना एका गोष्टीचा विसर पडला की, खेळापेक्षा कुणी कधीही मोठे होऊ शकत नाही. विराट आणि रोहितला भारतीय संघात पर्याय नाही, असे पण नाही.
मुळात भारतात गेल्या अनेक काळापासून उदयोन्मुख खेळाडूंची एक मोठी फळी आंतरराष्ट्रीय पटलावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, वेंकटेश अय्यर, प्रियांक पांचाल, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड असे कित्येक खेळाडू संघात मोठी जबाबदारी पार पाडण्याची क्षमता ठेवतात. राहिला प्रश्न कर्णधारपदाचा तर विराटने जेव्हा पितृत्व रजा घेतली होती, तेव्हा अजिंक्य राहणेने ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत इतिहास घडवला होता. विराट कितीही मोठी खेळाडू असला तरी त्याच्यातील अहंकार कधीही त्याच्या कारकिर्दीसाठी मारक ठरू शकेल, याचा त्यालाही पत्ता लागणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, खेळ माणसाला विनम्रता शिकवतो. मग असे असताना तुमच्यात अहंकार कुठल्या गोष्टीचा मित्रांनो?