Join us  

विराटला नेमकं काय म्हणायचं आहे?, ज्यांनी तुला मेसेज केला नाही त्यांची नावं सांग; सुनिल गावस्कर यांनी विचारला प्रश्न

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 1:54 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या जुन्या लयुसार खेळत असून सुरू असलेल्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. यंदाच्या आशिया चषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत किंग कोहली पहिल्या स्थानावर असून पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरूद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघ आज श्रीलंकेशी (IND vs SL) भिडणार आहे. रविवारी झालेल्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते. आता याच विधानावरून क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आले असून विराटला प्रश्न विचारले जात आहेत. 

दरम्यान, मी कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर महेंद्रसिंग धोनीशिवाय कोणत्याच सहकाऱ्याने माझ्याशी संपर्क साधला नव्हता असे विराटने म्हटले होते. आता यावरून भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी विराटला प्रश्न विचारला आहे. ज्यांनी त्याला मेसेज केले नाही त्यांची नावे विराटने सांगावीत, असे सुनील गावस्कर म्हणाले. कोहलीला सार्वजनिक व्यासपीठावर असे का बोलावे लागले हे मला खरच समजत नाही, असे म्हणून गावस्करांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

गावस्करांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना म्हटले, "या सर्व खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये काय परिस्थिती होती हे मला माहीत नाही. मला असे वाटते की जर त्याने त्याच्याशी संपर्क साधलेल्या एका व्यक्तीचे नाव घेतले आहे मग संपर्क न साधलेल्या इतर लोकांचीही नावे त्याने घ्यायला हवीत. मग प्रत्येकजण त्याच्याशी संपर्क साधत नाही असा विचार करण्याऐवजी संबंधित प्रत्येक व्यक्तीला समजण्यासाठी हे थोडे सोप्पे ठरेल." एकूणच गावस्करांनी विराट कोहलीच्या त्या विधानावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

विराटच्या 'त्या' विधानामुळे रंगली चर्चा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत विराट कोहली महेंद्रसिंग धोनीसोबतच्या त्याच्या बॉन्डबद्दल म्हणाला होता की, "मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की, जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा मला फक्त एका व्यक्तीने मेसेज केला होता ज्याच्यासोबत मी खेळलो आहे आणि तो होता एम.एस धोनी. अनेक लोकांकडे माझा नंबर आहे. म्हणजे बरेच लोक काय करायचे ते सल्ले देतात. त्यांना खूप काही सांगायचे आहे, पण ज्यांच्याकडे माझा नंबर आहे. त्यांच्याकडून एकही मेसेज आला नाही." विराटने पत्रकार परिषदेतून एकप्रकारे इतर सहकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. 

 

टॅग्स :एशिया कप 2022भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीसुनील गावसकरमहेंद्रसिंग धोनी
Open in App