नवी दिल्ली : मेलबोर्न कसोटीत पाच गोलंदाजांसह खेळण्याची भारताची रणनीती यशस्वी ठरली, पण सिडनीमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील टीमपुढे संघाच्या निवडीचा पेच राहील. विशेषत: रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर सलामीवीराबाबत कठीण निर्णय घ्यावा लागेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेल्या वर्षी मायदेशातील मालिकेत सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित कमालीचा यशस्वी ठरला होता, पण सरावाचा अभाव व सध्याची परिस्थिती बघता त्याच्या सलामीला खेळण्याबाबत साशंकता आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मेलबोर्नमध्ये ८ गडी राखून विजय मिळविल्यानतंर म्हटले होते, ‘आम्ही त्याच्यासोबत चर्चा करू आणि शारीरिकदृष्ट्या तो कशा स्थितीत आहे, हे बघावे लागेल. कारण तो दोन आठवड्यांपासून विलगीकरणात आहे. त्याची मानसिकता कशी आहे, हे बघावे लागेल.’ शुभमन गिलने पहिल्या कसोटीत प्रभावित केले त्यामुळे रोहितच्या पुनरागमनानंतर मयांक अग्रवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल.
मयांक या मालिकेत फॉर्मात नाही. एकाच डावात त्याला दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. २०१८ च्या दौऱ्यात दिसलेला मयांक या दौऱ्यात हरवलेला दिसत आहे. तसे त्याला वगळण्याचा निर्णय कठीण असेल. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध कसोटीमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून रोहितची खरी परीक्षा झाली असती, पण तो दुखापतग्रस्त झाला होता. तो यावेळी दुखापतीतून सावरल्यानंतर परतत आहे आणि १० नोव्हेंबरला आयपीएल फायनलमध्ये अखेरचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करणे आव्हान आहे. कारण तो डावाची सुरुवात करतो.
भारताचे माजी मुख्य निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर म्हणाले की, ‘विहारी व मयांक या दोघांनाही वगळून रोहित व केएल राहुल यांना संधी मिळू शकते.’
ते म्हणाले, ‘शुभमन गिलने प्रभावित केले आहे. त्याच्याकडे तंत्र व स्थिरता आहे. मयांकच्या स्थानी मी राहुलला आणि विहारीच्या स्थानी रोहितला खेळविण्यास प्राधान्य देईल. मी रोहितला चौथ्या किंव्या पाचव्या क्रमांकावर खेळविण्यास इच्छुक राहीन. राहुल फॉर्मात असून तो प्रदीर्घ कालावधीपासून ऑस्ट्रेलियात आहे. मयांक चांगला खेळाडू आहे, पण सध्या त्याच्यात आत्मविश्वासाची उणीव भासत आहे. रहाणे फॉर्मात असून भारतीय संघ मजबूत भासत आहे.’