मुंबई : सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर हे भारताचे माजी महान क्रिकेटपटू. माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली, यांच्या नावावर भरपूर धावा आहेत. पण या चौघांनाही जे फलंदाजीत करता आले नाही ते एका गोलंदाजाने करून दाखवल्याचा दाखला आहे. मराठमोळ्या या खेळाडूचा फलंदाजीतील हा विक्रम या चौघांच्याही पल्याडचा आहे.
क्रिकेट विश्वाची पंढरी म्हणजे लॉर्ड्स. या मैदानात आपण शतक पूर्ण करावे, असे प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. पण आतापर्यंत बऱ्याच महान फलंदाजांना हे जमलेले नाही. सचिन, सुनील, कोहली, धोनी यांना या मैदानावर एकही शतक झळकावता आलेले नाही. पण मराठमोळ्या अजित आगरकरने मात्र या मैदानात शतक झळकावत इतिहास रचला होता.
आज अजितचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्याबाबतच्या काही बातम्या सर्वांसमोर येत आहेत. पण ही गोष्ट मात्र बऱ्याच जणांना माहिती नसावी.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असताना सर्वात हँडसम भारतीय क्रिकेटपटू म्हणून आगरकरची वेगळीच ओळख होती. त्यामुळेच त्याची लव्ह स्टोरीही बॉलिवूड चित्रपटासारखी आहे. आगरकरने 1999 मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले. त्याच दरम्यान त्याची ओळख फातिमासोबत झाली. फातिमा ही आगरकरचा खास मित्र मजहर याची बहीण... मजहरसोबतच्या मैत्रीमुळेच आगरकरची फातिमाशी ओळख झाली आणि त्यांच्यातही मैत्री झाली. सामन्यादरम्यान फातिमाही भावासोबत स्टेडियममध्ये यायची आणि तेव्हाच आगरकर व तिच्या प्रेमाला सुरुवात झाली. त्यानंतर ही दोघं एकमेकांना भेटू लागले आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
दोघांचे धर्म वेगवेगळे असल्यानं त्यावेळी बरीच टीका झाली. आगरकर हा मराठी ब्राह्मण, तर फातिमा ही मुस्लीम होती. दोघांच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हतं. पण, धर्माची ही भींत तोडून या दोघांनी 9 फेब्रुवारी 2002मध्ये लग्न केले. या जोडप्याला एक मुलगाही आहे आणि त्याचं नाव राज असं आहे.