नवी दिल्ली: आयपीएलचे तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी यंदा कमालीची ढेपाळली. नऊपैकी सात सामने गमावल्याने प्ले-ऑफच्या चढाओढीतून हा संघ बाहेर होण्याची स्थिती आहे.
संपूर्ण संघाला आणि विशेषत: कर्णधार महेंद्रसिंग धोनीला काहीच प्रभाव टाकता आलेला नाही. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव होताच माजी दिग्गज कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीची संघ निवड आणि विशिष्ट खेळाडूला दिले जाणारे झुकते माप या गोष्टींवर सडकून टीका केली.
श्रीकांत म्हणाले,‘आयपीएलमध्ये धोनीची संघ निवड हास्यास्पद आणि बकवास आहे. सोमवारी राजस्थानकडून चेन्नईचा स्पर्धेत सातवा पराभव झाला. या संघाने जेव्हा स्पर्धेत भाग घेतला तेव्हा ते प्ले-आॅफमध्ये पोहोचले आहेत. यंदा मात्र चेन्नई पहिल्या चारमध्ये जागा मिळवेल असे दिसत नाही. सामना झाल्यानंतर धोनीने,‘ युवा खेळाडूंमध्ये स्पार्क न दिसल्यामुळे त्यांना संघात घेतले नाही, ’ असा युक्तिवाद केला.
धोनीच्या वक्तव्यावर माजी निवड समिती प्रमुख राहिलेले श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली. पीयूष चावला आणि केदार जाधव यांना पुन्हा संघात घेतल्याबद्दल त्यांनी हल्ला चढवला. जाधवबाबत बोलताना ते म्हणाले, त्याला मैदानात चालण्यासाठी स्कूटरची गरज लागते.
धोनी ज्या प्रक्रियेबद्दल बोलत आहे ती मला पटत नाही. जो सातत्याने प्रक्रियेबद्दल बोलत आहे. ज्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही सातत्याने प्रक्रियेबद्दल बोलू शकता पण निवड प्रक्रिया योग्य नाही, असे श्रीकांत म्हणाले.
श्रीकांत हे आयपीएलच्या पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे ब्रॅण्ड अम्बेसडर देखील होते. ते पुढे म्हणाले, एन. जगदीशन चांगला खेळाडू असून त्याला संधी दिली गेली नाही. त्याला फक्त एक मॅचमध्ये संधी दिली त्याने बँगलोरविरुद्ध ३३ धावा केल्या. केदार जाधवने ८ सामन्यात ६२ धावा केल्या. तो कोणत्याही प्रकारचा प्रभाव टाकू शकला नाही.
धोनीला काय म्हणायचे आहे की, जगदीशनमध्ये स्पार्क नाही. पण स्कूटर जाधवमध्ये स्पार्क आहे? धोनी म्हणतो की दबाव नाही तर तो युवा खेळाडूंना कधी संधी देणार. त्याला जगदीशनमध्ये स्पार्क दिसला नाही का? पीयूष चावला आणि केदार जाधवमध्ये काय स्पार्क दिसला? असा सवाल श्रीकांत यांनी केला. धोनी मोठा खेळाडू आहे, यात काहीच शंका नाही. पण मला त्याची ही गोष्ट पटत नसल्याचे श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
Web Title: What is the spark between Piyush Chawla and Kedar Jadhav? Dhoni's team selection is ridiculous says k shrikanth
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.