women premier league 2023 । मुंबई : महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. काल महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईत लिलाव पार पडला. पाच फ्रँचायझींनी 87 खेळाडूंवर 59.50 कोटी रुपये खर्च करून पहिला WPL लिलाव संपवला. BCCI ने लिलावासाठी 409 खेळाडूंची निवड केली होती, ज्यात 270 भारतीयांचा समावेश होता.
दरम्यान, महिला प्रीमियर लीग 2023 चा लिलाव संपला आहे आणि सर्व संघांची यादी चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे. पण या सर्वांमध्ये जो संघ सर्वात बलाढ्य वाटतो तो म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB). आरसीबीचा संघ पाहून क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. स्मृती मानधनाला 3.40 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर बंगळुरूच्या फ्रॅंचायझीने एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग आणि रिचा घोष यांनाही संघात सामील करून घेतले आणि लीगमधील सर्वात मजबूत संघ म्हणून ओळख निर्माण केली.
स्मृती मानधनावर पैशांचा वर्षाव भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.40 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. याशिवाय मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नॅट शीव्हर ब्रंटला 3.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले. मराठमोळी स्मृती महिला प्रीमियर लीगमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. खरं तर आरसीबीच्या पुरूष संघाला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही. त्यामुळे स्मृती मानधना आणि एलिसे पेरी यांचा संघ महिला प्रीमियर लीगमध्ये यश संपादन करेल असा चाहत्यांना विश्वास आहे.
आरसीबीच्या पुरुष संघाबद्दल भाष्य करायचे झाले तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तीन वेळा स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. यामध्ये 2009, 2011 आणि 2016 या वर्षांचा समावेश आहे. मात्र आजपर्यंत संघाला एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ 2011 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत झाला होता. आरसीबीने अद्याप आपल्या महिला संघासाठी कोचिंग स्टाफची घोषणा केलेली नाही. त्याचवेळी स्मृती मानधना कर्णधार बनणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
आरसीबीचे सर्वात महागडे खेळाडू -
- स्मृती मानधना - 3.40 कोटी
- सोफी डिव्हाईन - 50 लाख
- एलिसा पेरी - 1.70 कोटी
- रेणुका सिंग - 1.50 कोटी
- ऋचा घोष - 1.90 कोटी
- एरिन बर्न्स - 30 लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"