मुंबई : कोंबडा आरवला नाही म्हणून काही सूर्य उगवायचा थांबत नाही. तुमच्यामध्ये जर गुणवत्ता असेल तर ती लोकांपुढे येण्यावाचून राहत नाही. अशीच एक गोष्ट घडलेली पाहायला मिळते. एका लहानग्याकडे अफाट गुणवत्ता आहे. पण फक्त घरची आर्थिक परिस्थिती चागंली नसल्यामुळे त्याच्यावर क्रिकेट सोडण्याची वेळ येऊ शकली असती. पण आता या मुलाची गुणवत्ता पाहून सर्व समस्या संपलेल्या पाहायला मिळत आहेत.
एका लहान खेळाडूचा बॅटींग करतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच वायरल झाला होता. भारताचा कर्णधार विराट कोहली हा व्हिडीओ पाहून थक्क झाला होता. हा मुलगा आहे तरी कोण, असं म्हणत कोहलीने त्याचा शोध सुरु केला होता. पण सध्याच्या घडीला हा लहानगा आता बिनधास्तपणे खेळू शकणार आहे. कारण भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या अकादमीने त्याचा सर्व खर्च उचलण्याचे ठरवले आहे. हा नशिबवान लहानगा ठरला आहे शेख शाहिद.
याबाबत शेख शाहिदचे वडिल शेख शमशेर यांनी सांगितले की, " दोन वर्षांचा असतानाच शाहिदने क्रिकेटपटू व्हायचे ठरवले होते. एकदा घरी सामना पाहत असताना तो घरीच बॅटींग करत होता. त्याची ती बॅटींग पाहून मी भारावून गेलो होतो. त्यानंतर मी त्याला प्रशिक्षकांकडे घेऊन गेलो. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही, पण त्याचा वाईट परीणाम माझ्या मुलावर होऊ नये, असे मला वाटते."
शाहिदचे प्रशिक्षक अमित चक्रवर्ती यांनी सांगितले की, " जेव्हा शमशेर हे शाहिदला घेऊन आला तेव्हा मला या मुलाला कसा प्रवेश द्यायचा असा प्रश्न पडला होता. कारण तो वयाने लहान आहे. त्यामुळे मी त्यांना टाळत होतो आणि अकादमीमध्ये प्रवेश मिळणार नाही, असेही सांगितले होते. पण शमशेर हे काही ऐकायला तयार नव्हते. त्यांना शांत करून घरी पाठवण्यासाठी मी शाहिदला एक चेंडू खेळायला सांगितले. या चेंडूवर शाहिदने कडकडीत स्ट्रेट ड्राइव्ह लगावला. त्यानंतर मी त्याला काही चेंडू खेळायला दिले आणि त्याच्यामधील प्रतिभा मला समजली."
ही गोष्ट गांगुलीला समजली होती. त्यानंतर गांगुलीने लंडनहून आपल्या सॉल्टलेक येथील क्रिकेट अकादमीला फोन केला आणि शाहिदबद्दल माहिती मिळवण्यास सांगितले. त्यानंतर शाहिदच्या प्रशिक्षकांचा शोध घेतला. आता गांगुली यांची क्रिकेट अकादमी शाहिदचा पूर्ण खर्च उचलणार आहे.