भारतीय संघानं युवा खेळाडूंच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. वॉशिंग्टन सुंदरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानं तिचं सोनं केलं. ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर वॉशिंग्टननं पदार्पण केलं आणि आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताच्या ऐतिहासिक विजयात खारीचा वाटा उचलला. भारतानं हा सामना तीन विकेट्सनं जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली व बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली.
अनुभवी खेळाडू जायबंदी झाल्यानंतर या मालिकेत वॉशिंग्टन प्रमाणे मोहम्मद सिराज, टी नटराजन, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर यांनी पदार्पण केलं. आर अश्विन दुखापतग्रस्त झाल्यामुळे वॉशिंग्टनला चौथ्या सामन्यात संधी मिळाली आमि त्यानं १४४ चेंडूंत ६२ धावा ( ४ चौकार व १ षटकार) केल्या. या ऐतिहासिक कसोटीची आठवण कायम लक्षात रहावी म्हणून वॉशिंग्टननं त्याच्या पाळीव कुत्र्याचं नाव 'गॅबा' असे ठेवले आणि सोशल मीडियावर त्यानं फोटोही पोस्ट केला.