बॅंकॉक : थायलंडमध्ये सुट्यांचा आनंद घेण्यासाठी काही दिवसांसाठी आलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचा वयाच्या ५२व्या वर्षी शुक्रवारी मृत्यू झाला. निधनानंतर त्याचा शवविच्छेदनाचा अहवाल सोमवारी आला. त्यात त्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले. घातपाताची कुठलीही शंका उपस्थित करण्यात आली नाही. वॉर्नच्या कुटुंबीयांनीदेखील काही शंकावजा आरोप केला नव्हता.
दरम्यान, वॉर्नच्या मृत्यूसंदर्भात रोज नवीन माहिती आणि खुलासे पुढे येत आहेत. शेन वॉर्न थायलंडमधील ज्या रिसॉर्टमध्ये थांबला होता तेथील सीसीटीव्ही फुटेजही मंगळवारी पुढे आले. या फुटेजमध्ये शेन वॉर्न आणि त्याच्या मित्रांना मसाज देण्यासाठी थायलंडमधील चार महिला रिसॉर्टमध्ये आल्याचे दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजची वेळ ही वॉर्नच्या मृत्यूची बातमी सार्वजनिक झाल्यानंतरची आहे. पोलिसांनी यापूर्वी जारी केलेल्या माहितीमध्ये वॉर्नच्या रूममध्ये रक्ताचे डाग आढळून आले होते. मात्र ते सीपीआर देताना पडल्याची माहिती नंतर देण्यात आली.
त्या दिवशी नेमके काय घडले?‘डेलीमेल डॉट को डॉट यूके’ने दिलेल्या वृत्तानुसार एका महिलेने रिसॉर्टच्या रिसेप्शनवर आपण शेन वॉर्नला फूटमसाज देण्यासाठी आल्याचे सांगून प्रवेश केला. ती महिला जेव्हा वॉर्नच्या खोलीच्या दरवाजाजवळ गेली आणि तिने दरवाजा ठोठावला तेव्हा दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यानंतर आत रूममध्ये वॉर्न मृतावस्थेत पडल्याचे नंतर निष्पन्न झाले.
वॉर्नला जिवंत पाहणाऱ्या त्या दोघीच…‘डेलीमेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज हे स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या आसपासचे आहेत. मसाजसाठी आलेल्या चार महिलांपैकी दोन महिला वॉर्नच्या रूमकडे गेल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याच दोन महिला आहेत, ज्यांनी वॉर्नला शेवटचे जिवंत पाहिले होते.
पोलिसांचे ते पत्रक...वॉर्नच्या मृत्यूसंदर्भात थायलंड पोलिसांनी एक पत्रक जारी केले आहे. यात वॉर्नचे निधन सायंकाळी ५.१५ च्या सुमारास झाले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्याच्या रूममध्ये अशी कोणतीही गोष्ट आढळून आली नाही ज्यामुळे त्याच्या मृत्यूसंदर्भात शंका घेता येईल. शेन वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालातही कोणतीही शंका घेण्यासारखी बाब आढळून आलेली नाही. वॉर्नने या महिलांना मसाज सेवा देण्यासाठी बोलावले होते. या महिलांचा त्याच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
फुटेजमध्ये काय?n थायलंड पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यात चार महिला एकाचवेळी लॉबीमधून बाहेर पडताना दिसत आहेत. n शेन वॉर्नचा मृतदेह रूममध्ये आढळण्याच्या काही मिनिटांपूर्वीचे हे दृश्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या चार महिलांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांना ५ वाजता वॉर्न आणि त्याच्या मित्रांनी मसाज देण्यासाठी बोलावले होते. n यामध्ये मसाज, फूटमसाज आणि नेल ट्रीटमेंट करायची असल्याची ऑर्डर देण्यात आली होती. यातील एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती वॉर्नच्या रूमजवळ पोहचली आणि दरवाजा ठोठावला तेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या महिलेने तिच्या बॉसला मेसेज करून वॉर्न दरवाजा उघडत नाही, अशी माहिती दिली. n या महिलेला दरवाजा उघडता आला नाही तेव्हा वॉर्नच्या मित्रांनी दरवाजा उघडला. या साऱ्या प्रकारानंतर काही वेळातच वॉर्नचे निधन झाल्याचे पुढे आले. सर्वांनी रूममध्ये प्रवेश केला तेव्हा वॉर्न मृतावस्थेत आढळला. त्याला सीपीआर म्हणजेच तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न एका मित्राने केला. n तितक्यात दुसऱ्याने रुग्णवाहिका बोलावली. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वॉर्नचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्न आणि त्याच्या मित्रांनी संपूर्ण मसाजसाठी बुकिंग केले होते. मात्र वॉर्नने खोलीचा दरवाजा न उघडल्याने त्यांनी इतर मित्रांशी संपर्क साधून दरवाजा उघडला.