IPL Auction 2022 Live Updates: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्धची (IND vs WI) वन डे मालिका ३-० ने जिंकली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २६५ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने अडीचशे पार मजल मारली. या आव्हानास प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. अष्टपैलू ओडियन स्मिथने सर्वाधिक ३६ धावा केल्या. या सामन्यानंतर रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी Mumbai Indians चा कर्णधार Rohit Sharma ने IPL लिलावासंबंधी एक मजेशीर उत्तर दिलं.
रोहित शर्मा म्हणाला की IPL संघांनी ज्या खेळाडूंना रिटेन केलेलं नाही ते खेळाडू टीव्हीला चिकटूनच बसलतील याचा मला विश्वास आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसले. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा वेळी, ऑक्शन सुरू असताना तू काय करशील? असा सवाल रोहितला विचारण्यात आला. त्यावर रोहितने मजेशीर उत्तर दिलं. "सगळे क्रिकेट रसिक आणि ज्या खेळाडूंना रिटेन करण्यात आलेलं नाही असे सारे खेळाडू दोन दिवस टीव्हीला चिकटून बसतील याची मला खात्री आहे. कोणाला विकत घेतलं जातं. कोणावर किती बोली लागते यावर लक्ष असणार आहे. त्यामुळे मी तर ऑक्शनच्या वेळी माझा फोन स्विच ऑफ करून बसणार आहे", असं मजेशीर उत्तर रोहितने दिलं.
IPL 2022 साठीचा लिलाव आज आणि उद्या म्हणजेच १२-१३ फेब्रुवारीला होणार आहे. बंगळुरूला हा लिलाव होणार असून सकाळी ११ वाजल्यापासून लिलावाला सुरूवात होणार आहे. तब्बल ६०० खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. यंदाच्या वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन केलं आहे. या लिलावात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला एक सलामीवीर हवा असून त्यासाठी शिखर धवनच्या नावाची चर्चा आहे. त्याशिवाय, गोलंदाजीतही भारताच्या शार्दूल ठाकूरवर मुंबईचा संघ बोली लावू शकतो असं बोललं जात आहे.