नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तंदुरुस्तीप्रती जागरुक असलेल्या विशेषज्ञ आणि सेलिब्रेटींशी आॅनलाईन संवाद साधला. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने, ‘यो-यो चाचणीमुळे भारतीय क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचा स्तर खूप वाढला आहे,’ असे सांगितले. यावर मोदी यांनी कोहलीला, ‘यो-यो चाचणी नेमकं आहे तरी काय?’ असा प्रश्न केला.
मोदी यांनी विचारले की, ‘मी खूप ऐकले आहे की, सध्या संघांमध्ये यो-यो चाचणी केली जाते. ही यो-यो चाचणी काय आहे?’ यावर कोहलीने उत्तर दिले की, ‘तंदुरुस्तीच्या दृष्टीने ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावरील तंदुरुस्तीचा विचार केल्यास अजूनही आम्ही इतर संघांच्या तुलनेत मागे आहोत आणि यासाठी या स्तरामध्ये आम्हाला अधिक सुधारणा करायची आहे.’यो- यो चाचणी२० मीटर अंतरापर्यंत ठेवलेल्या दोन कोनांच्या मधून खेळाडूंना वेगात धावायचे असते. सॉफ्टवेअरमधून पहिला बीप मिळाल्यानंतर खेळाडू एका कोनापासून दुसऱ्या कोनापर्यंत धावतो. दुसºया कोनापर्यंत पोहचल्यावर दुसरा बीप ऐकू येतो. यानुसार खेळाडूने दिलेल्या वेळेची नोंद होते आणि अखेरीस मिळालेल्या गुणानुसार खेळाडू किती तंदुरुस्त आहे ते कळते.