Join us

जेव्हा आशिष नेहरा सौरव गांगुलीला बोलला होता, 'घाबरु नकोस, मी आहे'

माजी क्रिकेटर हेमांग बदानीने कशाप्रकारे आशिष नेहराने सौरव गांगुलीला न घाबरण्याचा सल्ला दिला होता ही आठवण शेअर केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 12:56 IST

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेटर आशिष नेहराने 18 वर्षाच्या करिअरनंतर अखेर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळला गेलेला टी-20 सामना आशिष नेहराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचा सामना होता. दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावर सन्मानपुर्वक आशिष नेहराला निरोप देण्यात आला. आशिष नेहराच्या निवृत्तीनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, आपल्या आठवणी शेअर केल्या. माजी क्रिकेटर हेमांग बदानी यांनीदेखील फेसबूकच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत आशिष नेहराला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी काही आठवणीही सांगितल्या आहेत. यावेली हेमांग बदानीने कशाप्रकारे आशिष नेहराने सौरव गांगुलीला न घाबरण्याचा सल्ला दिला होता याबद्दलही सांगितलं आहे.

या घटनेबद्दल सांगताना हेमांग बदानीने सांगितलं की, ही 2004 मधली गोष्ट आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तानदरम्यान कराचीत सीरिज खेळली जात होती. आम्ही पाकिस्तानसमोर 350 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण पाकिस्तान संघ चांगला खेळत होता. अखेरच्या ओव्हरमध्ये त्यांना जिंकण्यासाठी फक्त नऊ ते दहा धावांची गरज होती. त्यावेळी शेवटची ओव्हर कोणाला द्यायची यावरुन संघ अडचणीत होता. काय करावं कोणाला कळत नव्हतं. त्यावेळी आशिष नेहरा धावत सौरव गांगुलीकडे आला. गांगुलीजवळ येऊन आशिष नेहरा बोलला की, 'दादा मी बॉलिंग करतो, तुम्ही घाबरु नका. मी तुम्हाला मॅच जिंकवून देतो'.

नेहरा जे बोलला ते करुन दाखवलं. नेहराने त्या ओव्हरमध्ये फक्त तीन धावा दिल्या आणि एक विकेट घेत पाकिस्तानचा पराभव केला. 

नेहराचा १८ वर्षांचा रोमांचक प्रवासभारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहरा न्यूझीलंडविरोधातील सामन्यानंतर निवृत्त झाला. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात १९९९ मध्ये कसोटी पदार्पण करणाºया आशिष नेहराने २००४ नंतर कसोटी, तर २०११ च्या विश्वचषकातील सामन्यानंतर एकदिवसीय सामना खेळलेला नाही. २००९ मध्ये भारताकडून श्रीलंकेविरोधात टी-२०त पदार्पण करणारा नेहरा आज आश्विन आणि बुमराहनंतर सर्वाधिक बळी मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज आहे. त्याने २७ टी-२० सामन्यांत ३४ बळी मिळवले आहेत. आश्विनने ५२, तर बुमराहने ३८ बळी घेतले आहेत. नेहराने १७ कसोटी सामन्यात ४४, तर १२० एकदिवसीय सामन्यांत १५७ गडी बाद केले आहेत.

टॅग्स :आशिष नेहराभारतीय क्रिकेट संघ