मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा चांगलाच गाजवला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सर्वाधिक ५२१ धावा या पुजाराच्याच नावावर होत्या. पण या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यापासून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पुजारावर शाब्दिक हल्ले करत होते, पण पुजाराची चिकाटी पाहून तेदेखील दमले. हा अनुभव सांगितला आहे तो दस्तुरखुद्द पुजाराने.
पुजारा म्हणाला की, " ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या सामन्यापासून कर्णधार टिम पेन आणि नॅथन लायन माझ्यावर शाब्दिक हल्ले करत होते. त्यांना वाटले या हल्ल्यांना मी बळी पडेन. पण मी एकाग्रचित्ताने फलंदाजी केली. त्यामुळे तिसऱ्या आणि कसोटी सामन्यात स्लेजिंगकरून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दमले. त्यावेळी लायन मला म्हणाला होता की, एवढी फलंदाजी करून तु दमत कसा नाहीस? "
वडील हॉस्पिटलमध्ये असतानाही पुजारा देशासाठी खेळत होता...चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात तर पुजाराने 193 धावांची दमदार खेळी साकारली. पण पुजारा जेव्हा मैदानात आपल्या देशासाठी लढत होता, आपले कर्तव्य बजावत होता तेव्हा त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.
पुजाराचे वडील अरविंद आपल्या मुलाची खेळी पाहू शकले नाहीत. कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अरविंद यांचे हृदय व्यवस्थित कार्य करत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेव्हा त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले तेव्हा पुजारा फलंदाजी करत होता. त्यामुळे त्यांना आपल्या मुलाची फलंदाजी पाहता आली नाही. पण लोकांच्या चर्चेमधून चेतेश्वर चांगली फलंदाजी करत असल्याचे कळत होते. लोकं चेतेश्वरबद्दल भरभरून बोलत होती, हे सारं पाहून मला फार आनंद झाला, असे अरविंद पुजारा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही, पंतने ख्वाजाला सुनावले कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात शाब्दिक बाणांना दोन्ही संघांकडून सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही संघांकडून बरीच स्लेजिंग या पहिल्या सामन्यातील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला खडे बोल सुनावले.
पहिल्या डावात फलंदाजी करत असताना भारताचा डाव चेतेश्वर पुजाराने सावरला. पुजाराच्या शतकाच्या जोरावर भारताला 250 धावा करता आल्या होत्या. पुजाराने जशी फलंदाजी केली, त्याची नक्कल ख्वाजा करत होता. त्यावेळी पंतने ख्वाजाला चांगलेच सुनावले.