Join us  

जेव्हा प्रशिक्षक भारतीय खेळाडूंना सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला देतात...

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:58 AM

Open in App

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. देशातच नव्हे तर परदेशातही भारतीय संघ क्रिकेटच्या तीनही प्रकारात वर्चस्व गाजवत आहेत. त्यामुळेच कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 क्रमवारीत भारतीय संघ अव्वल पाचात आहे. कसोटीत तर भारताने अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियात 71 वर्षांनी भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला तो कोहलीच्या नेतृत्वाखालीच. भारतीय संघाच्या कामगिरीचा चढा आलेख पाहता यंदाचा वन डे वर्ल्ड कप आपलाच, असा दावा केला जात होता. पण, टीम इंडियाला उपांत्य फेरीत अपयश आले आणि चाहते प्रचंड निराश झाले. भारताला तिसऱ्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावता आला नाही.

भारताने 1983मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथम वर्ल्ड कप उंचावला आणि त्यानंतर हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी 2011 उजाडले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला नमवून वर्ल्ड कप उंचावला. माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण झाले होते. भारताच्या या यशात दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर गॅरी कर्स्टन यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे जेतेपदाच्या जल्लोषात संघातील खेळाडूंनी कर्स्टन यांना खांद्यावर उचलून मैदानावर प्रदक्षिण घातली होती.

कर्स्टन यांचा कार्यकाळ लौकिकास साजेसा राहिला, परंतु एका गोष्टीमुळे त्यांच्याविरुद्ध देशभरातून संतापाची लाट उसळली होती. हा किस्सा आहे 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यानचा. दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी कर्स्टन यांनी भारतीय खेळाडूंना एक सल्ला दिला होता. त्यांनी खेळाडूंना कामगिरी उंचावण्यासाठी सामन्यापूर्वी सेक्स करा, असे सांगितले होते. कर्स्टन आणि पॅडी अप्टन यांनी खेळाडूंसाठी तयार केलेले डॉक्युमेंट्स मीडियात लिक झाल्यानंतर ही बातमी समोर आली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान यांच्या सामन्यापूर्वी हे डॉक्युमेंट्स लिक झाले होते. त्यात असा सल्ला दिला होता की,''सामन्यापूर्वी सेक्स करणं चांगलं.. त्यानं खेळाडूंना फायदा मिळतो. मानसिकदृष्ट्या विचार केल्यास, सेक्स केल्यानं शरिरातील टेस्टोस्टेरॉन वाढतात आणि त्यामुळे खेळाडूंना ताकद, ऊर्जा मिळते.'' 

कर्स्टन यांच्या या सल्ल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. परंतु त्यांनी असा सल्ला दिला नसल्याचं स्पष्टीकरण दिले होते.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयसीसीभारतलैंगिक जीवन