चेन्नई : महेंद्रसिंग धोनीचे फटके साऱ्यांनाच परवलीचे. त्याच्या 'हेलिकॉफ्टर' या फटक्याचे तर सारेच चाहते आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये धोनीकडून चांगले फटके पाहायला मिळत नाही, असे टीकाकार म्हणत असतात. पण धोनीने आता असे काही फटके मारले आहेत की ते थेट मैदानाबाहेर गेले आहेत. हे फटके पाहून त्याच्या टीकाकारांचे डोळे विस्फारतील. हे घडले नेमके कधी, याचा अदमास हे टीकाकार घेत आहेत.
यंदाच्या आयपीएलला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. दोन वर्षांनी चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे यावर्षी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
धोनीने आयपीएलच्या सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नईमध्ये त्याने गुरुवारी सराव केला. यावेळी चेन्नईच्या संघाने आपल्या ट्विटर हँडलवर धोनीच्या सरावाचे फोटो आणि व्हीडिओ पोस्ट केले आहेत. यावेळी त्यांनी धोनीच्या सरावाच्या पोस्टवर 'कृपया पार्किंगमध्ये गेलेले चेंडू घेऊन या, ' असे म्हटले आहे. या त्यांच्या विधानाचा अर्थ धोनीने सराव करताना बरेच चेंडू पार्किंगमध्ये भिरकावले आहेत, असा होतो.