चेन्नई : ' कॅप्टन कूल ' असे म्हटल्यावर आपसूकच डोळ्यासमोर उभा राहतो तो महेंद्रसिंग धोनी. परिस्थिती कितीही बिकट असो, दडपण कितीही असो धोनी मात्र कायम शांतच असतो. त्याला भडकलेला फारसा कुणीच पाहिला नसेल. पण यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र तो एकदा चांगलाच भडकला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मनीष पांडेवर धोनी भडकला होता. मैदानात खेळत असताना त्याचे लक्ष क्रिकेटमध्ये नव्हते, त्यामुळे धोनी चांगलाच भडकला होता. या गोष्टीचा व्हीडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर मात्र धोनी रागावलेला पाहायला मिळालेला नाही. पण धोनीचा मित्र आणि चेन्नई सुपर किंग्ज संघातील त्याचा सहकारी सुरेश रैनाने मात्र धोनी कधी रागावला आणि त्याने रागावल्यावर काय केले, हे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यामध्ये अशी एक घटना घडली की धोनी त्यावेळी चांगलाच रागावला होता. धोनी नेहमीच गोलंदाजांना चेंडू कुठे टाकायचा हे सांगत असतो. पण या सामन्यात मात्र गोलंदाजांना धोनीच्या मार्गदर्शनानुसार चेंडू टाकता येत नव्हता. त्यावेळी धोनी चांगलाच भडकला होता. यावेळी धोनीने राजस्थानच्या एका फलंदाजाचा झेल टीपला आणि त्यानंतर आनंद साजरा न करता त्याने तो चेंडू जमिनीवर आदळला होता.
रैना काय सांगतो ते ऐका... "धोनी नेहमीच गोलंदाजांसाठी रणनीती आखत असतो. त्याला कोणता फलंदाज कसा खेळू शकतो, परिस्थिती कशी आहे, याचे चांगले ज्ञान असते. त्यानुसार तो गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. कामगिरीत नेहमीच सुधारणा व्हायला हवी, असे धोनीला वाटते. त्यामुळे साखळी सामन्यात चूक झाली तरी संधी मिळू शकते. पण बाद फेरीत एखादी चूक महागात ठरू शकते. त्यामुळे धोनी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात भडकला होता, " असे रैनाने सांगितले.