- ललित झांबरे
क्रिकेटच्या विक्रमांची दुनिया अद्भुत आणि अविश्वसनीय आहे म्हणून एका देशाचे दोन संघ एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कसोटी सामने खेळल्याची माहिती अविश्वसनीय वाटत असली तरी खरी आहे. हा आश्चर्यचकित करणारा विक्रम घडला 13 जानेवारी 1930 रोजी म्हणजे आजपासून बरोब्बर 87 वर्षापूर्वी आणि एकाचवेळी दोन-दोन कसोटी सामने खेळणारा संघ होता इंग्लंडचा. यापैकी एक सामना खेळला गेला न्यूझीलंडमधल्या ख्राईस्टचर्चच्या लँकेस्टर पार्क मैदानावर तर दुसरा खेळला गेला वेस्टइंडिजमधल्या ब्रिजटाऊनच्या केनसिंग्टन ओव्हल मैदानावर.
ख्राईस्टचर्चचा सामना हा न्यूझीलंडचा सर्वात पहिला कसोटी सामना होता. तीन दिवसांचा हा सामना 10 ते 13 जानेवारी 1930 रोजी (विश्रांतीचा दिवस 12 जानेवारी) खेळला गेला तर ब्रिजटाऊनचा कसोटी सामना 11 ते 16 जानेवारी 1930 दरम्यान खेळला गेला. यात 11 जानेवारीला ख्राईस्टचर्चला पावसामुळे अजिबात खेळ होऊ शकला नाही तर 12 जानेवारीला दोन्हीकडे विश्रांतीचा दिवस होता. त्यामुळे तिकडे न्यूझीलंडमध्ये आणि इकडे वेस्टइंडिजमध्ये, दोन्ही कसोटी सामन्यात एकाच दिवशी खेळ झाला तो एकमेव दिवस होता 13 जानेवारीचा.
यादिवशी ख्राईस्टचर्च इथे न्यूझीलंडला पहिल्या डावात 112 धावात गुंडाळल्यावर इंग्लंडने 4 बाद 147 वरुन खेळायला सुरुवात केली आणि 69 धावांची आघाडी मिळवून 181 धावांवर त्यांचा डाव आटोपला. यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी किवींना 131 धावात बाद करुन नंतर आठ विकेटनी सामनासुध्दा जिंकला. याप्रकारे एकाच दिवसात इंग्लंडने विजयाचे लक्ष्य गाठले.याच दिवशी म्हणजे 13 जानेवारी 1930 रोजी ख्राईस्टचर्चपासून 8700 मैल दूरवर वेस्टइंडिजमधल्या ब्रिजटाऊन येथे इंग्लंडने कसोटीच्या पहिल्या दिवशी 2 बाद 233 धावा केल्या.याप्रकारे या एकाच दिवशी इंग्लंडचे दोन संघ दोन वेगवेगळ्या ठिकाणी कसोटी सामने खेळल्याची अविश्वसनीय नोंद झाली. ब्रिजटाउनचा वेस्टइंडिजविरुध्दचा सामना पुढे अनिर्णित सुटला.
या एकाच दिवशी जगाच्या दोन वेगवेगळ्या भागात कसोटी सामने खेळलेले इंग्लंडचे संघ पुढीलप्रमाणे- विरुध्द न्यूझीलंड, ख्राईस्टचर्च- ( ई.डब्ल्यू. डॉसन, ए.एच.एच.गिलिगन -कर्णधार, के.एस. दुलीपसिंगजी, एफ.ई.वुली, जी.बी.लेगे, एम.एस.निकोल्स, टी.एस.वोर्थिंग्टन, एम.जे.एल. टर्नबूल, एफ. बराट, डब्ल्यु.एल. कॉर्नफोर्ड, मॉरिस अलम.
विरुध्द न्यूझीलंड, ब्रिजटाऊन- (जी.गन, ए. सँडहम, जी.टी.एस स्टिव्हन्स, ई.एच.हेंड्रैन, जे. ओकोनॉर, एल.ई.जी.एम्स, एन.ई. हैग, डब्ल्यू. ई. एस्टील, एफ.एस.जी. कलथ्रोप- कर्णधार, विल्फ्रेड ऱ्होडस्, बिल व्होस