Join us  

....जेव्हा भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला हरवले होते. 

सध्या क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चिली जाणारी मालिका म्हणून भारत - ऑस्ट्रेलिया मालिकेकडे पाहिले जाते. आज भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघापेक्षा काकणभर सरस आहे. कांगारूंना भारताचा दौरा अशात तेवढा सोपा राहिला नाही. परंतु, एक काळ तेव्हा क्रिकेट विश्वात कांगारूंची दहशत होती, त्यांच्या विरोधात सामना अनिर्णीत राखणे सुद्धा मोठी गोष्ट होती. यामुळेच त्यांच्यावर मिळवलेला पहिला विजय अविस्मरणीय आहे.

By सुमेध उघडे | Published: September 12, 2017 7:20 PM

Open in App

सध्या क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चिली जाणारी मालिका म्हणून भारत - ऑस्ट्रेलिया मालिकेकडे पाहिले जाते. आज भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघापेक्षा काकणभर सरस आहे. कांगारूंना भारताचा दौरा अशात तेवढा सोपा राहिला नाही. परंतु, एक काळ तेव्हा क्रिकेट विश्वात कांगारूंची दहशत होती, त्यांच्या विरोधात सामना अनिर्णीत राखणे सुद्धा मोठी गोष्ट होती. यामुळेच त्यांच्यावर मिळवलेला पहिला विजय अविस्मरणीय आहे. हि किमया साध्य झाली ऑस्ट्रेलियाच्या 1959 च्या क्रिकेट हंगामातील भारत दौ-यात. या मालिकेचे वैशिट्य म्हणजे भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यानची हि पाच सामन्यांची पहिली मालिका होती.

काळ होता 1959 चा, जेव्हा क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलिया ने आपली दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली होती. इंग्लंड आणि पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करून ते भारताच्या दौ-यावर आले होते. इकडे भारताने आपल्या शेवटच्या 13 टेस्ट सामन्यात 11 सामने गमावले होते. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि इंग्लंडने भारतीय संघावर एकहाती विजय मिळवले. 

मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व अष्टपैलू रिची बेनौद यांच्याकडे होते, तर भारतीय संघाचे नेतृत्व जीएस रामचंद यांच्याकडे होते. दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानावरील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान संघावर पूर्ण वर्चस्व गाजवले. अपेक्षेप्रमाणे कांगारूंनी भारतावर एक डाव व 127  धावांनी विजय मिळवला.कर्णधार बेनूदने या सामन्यात आपल्या फिरकीची जादू दाखवत सामन्यात 8 बळी मिळविले. दुसरीकडे नील हार्वेने उत्तम शतक झळकावले. भारताकडून पंकज रॉय यांच्या दुस-या डावातील  99 धावांची खेळी हीच एकमेव सुखद बाब होती.  

अविस्मरणीय दुसरी कसोटी पराभवाचे शल्य लपवत भारतीय संघाने कानपूर येथील दुस-या सामन्यासाठी जोरदार तयारी केली. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने होता.परंतु, संघाला पहिल्या डावामध्ये केवळ 152 धावा करता आल्या. संघ मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवू पाहणा-या ऑस्ट्रेलियीन संघसुद्धा पहिल्या डावात धावा उभारण्यात चाचपडला. पाहुण्यांचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला. याचे कारण होते जासू पटेल. होय, आपल्या अनोख्या शैलीत शैलीत ऑफ ब्रेक गोलंदाजी करणा-या जासू यांनी कांगारुना चांगलेच चकवले तब्बल 9 फलंदाजांना तंबूत धाडले. चंदू बोर्डे यांनी 1 बळी मिळवला. नाममात्र आघाडी भेटलेला ऑस्ट्रेलियन संघ भारताला दुस-या डावात लवकर गुंडाळण्याच्या इच्छेने मैदानात दाखल झाला. 

दुस-या डावात भारतीय संघाने चिवट फलंदाजी करत सलामीवीर नरी कॉट्रक्टर यांच्या 74 धावांच्या मदतीने 291 धावा केल्या व कांगारूंना विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले. पहिल्या डावातून धडा घेत कांगारूंनी सावध फलंदाजी केली. परंतु, या डावातही जासू ने दमदार गोलंदाजी करत कांगारूंना सळो कि पळो केले. जासू ने 5 तर पौल उम्रीकर यांनी 4 बळी मिळवत कांगारूंना 105 धावांवर गुंडाळले व 119 धावांनी विजय प्राप्त केला. या डावात कांगारूंच्या फक्त 3 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघाने कांगारूंवरील पहिल्या विजयाची नोंद केली. सामन्यात 14 बळी घेत निर्विवादपणे जासू पटेल या संस्मरणीय विजयाचे शिल्पकार ठरले.

मालिका कांगारूंनी जिंकली पुढे तिस-या कसोटीत दोन्ही संघांनी मालिकेवर विजयी आघाडी मिळवण्याच्या हेतूने खेळ केला. नरी कॉट्रक्टर यांनी या सामन्यात शानदार शतक झळकावले. दुसरीकडून नील हार्वी व नोर्म ओनील यांनी शतक ठोकली. यामुळे सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. मात्र, मद्रास येथील चौथ्या सामन्यात कांगारूंनी जोरदार मुसंडी मारत सामना जिंकत मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा सामना कोलकत्ता येथील इडन गार्डनवर झाला. दोन्ही संघाच्या फलंदाजांनी यात उत्कृष्ट खेळ केला. यामुळे ही कसोटी अनिर्णीत अवस्थेत संपली.भारताने मालिका जरी गमावली असली तरी ही मालिका, जासू पटेल यांच्या फिरकीने ऑस्ट्रलियावर मिळवलेल्या पहिल्या विजेयासाठी नेहमी लक्षात राहणारी असेल.