भारतीय क्रिकेटमध्ये अम्पायर नितिन मेनन ( Nitin Menon) हे नाव चाहत्यांच्या चांगल्याच परिचयाचे असेल... आयपीएलमध्ये मेनन यांच्या काही निकालांनी वादळ उठले होते, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या काही निकालांवर भारतीय चाहत्यांनी व स्टार खेळाडूंनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. तेच नितिन मेनन सध्या सुरू असलेल्या ॲशेस मालिकेत अम्पायरींग करताना दिसणार आहेत. ''गेल्या काही वर्षांत मायदेशात भारतीय संघाच्या अनेक सामन्यांत पंचगिरी केली. त्यामुळे दडपण आता पूर्णपणे नष्ट झाले आहे. तणावजन्य परिस्थितीत मन कसे शांत ठेवायचे, हे या सामन्यांतून शिकलो. याच अनुभवाचा उपयोग करून अॅशेसमध्ये यश मिळवायचे आहे,''असे भारतीय पंच नितीन मेनन म्हणाले.
यावेळी नितिन मेनन यांनी भारतीय स्टार खेळाडूंची पोलखोल केली आहे. ICC च्या एलिट पॅनेलमधील नितिन मेनन यांनी सांगितले की, ''भारतीय संघाचे सुपरस्टार नेहमीच दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. निकाल त्यांच्या बाजूने ५०-५० टक्के द्यावा यासाठी तो दबाव असतो आणि काही वेळा तसा निकाल देतो.'' नितिन यांच्या विधानाचा रोख विराट कोहलीकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील मार्चमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहलीने मेनन यांच्यावर कमेंट केली होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला मेनन यांनी नाबाद ठरवले होते, त्यावेळी क्षेत्ररक्षण करणारा विराट जवळ आला अन् म्हणालेला मी असतो तर मला बाद दिले असतेस.
PTI ला दिलेल्या मुलाखतीत नितिन म्हणाले,''जेव्हा टीम इंडिया भारतात खेळते तेव्हा खूप उत्साह असतो. भारतीय संघात अनेक स्टार्स आहेत, जे नेहमीच तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा निर्णयाबाबत ५०-५० अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा ते निर्णय त्यांच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतात. पण जर आपण दबावाखाली शांत राहू शकलो तर ते काय करतात याची आपल्याला पर्वा नाही.''