सिडनी : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चेंडूच्या छेडछाडीचा मुख्य सूत्रधार होता तो ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर. त्यामुळे त्याच्यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने एका वर्षाची बंदी घालण्याची कारवाई केली आहे. पण एका वर्षानंतर जेव्हा तो पुन्हा संघात परतेल, तेव्हा त्याला कर्णधारपद देण्यात येईल का, यावर ऑस्ट्रेलियामध्ये चर्चा सुरु होती. पण या चर्चेला क्रिकेट मंडळाने पूर्णविराम दिला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डेव्हिड पीवेर यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की, " जर वॉर्नरला जनतेने माफ केले तरच त्याला आम्ही कर्णधार करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या जनतेबरोबर क्रिकेट प्रशासनानेही त्याला माफ गरणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्याला संघाची कमान सोपवली जाऊ शकते. "
एका वर्षानंतर ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी वॉर्नर कितपत तंदुरुस्त असेल, हे सांगता येत नाही. कारण वॉर्नर सध्या 31 वर्षांचा आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ हा चांगलाच व्यावसायिक आहे. त्यामुळे सध्याची बंदी ही वॉर्नरची कारकिर्द संपवू शकते, असे म्हटले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड करणे, हे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना चांगलेच महागात पडले आहेत. आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर बीसीसीआयनेही कडक कारवाई केली आहे. या दोघांना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला आहे.