सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी अनेकदा धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. त्यांच्या विस्फोटक सलामीमुळे सुरुवातीच्या षटकांमध्येच भारतीय संघाच्या विजयाची पायाभरणी होत असे. दरम्यान, या दोघांनी ९३ एकदिवसीय डावांमध्ये ४२.१३ च्या सरासरीने ३ हजार ९१९ धावा फटकावल्या होत्या. त्यामध्ये १२ शतकी भागीदाऱ्या आणि १८ अर्धशतकी भागिदाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, आता वीरेंद्र सेहवागने एका मजेशीर गोष्टीचा उलगडा केला आहे. एकदा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिनचं शतक हुकल्यानंतर मला आनंद झाला होता, असं सेहवागने सांगितलं आहे.
एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वीरेंद्र सेहवागने सांगितले की, २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकरचं शतक हुकलं होतं. तो जेव्हा माघारी फिरत होता. त्यावेळी मी हसत होतो. त्यावेळी सचिने मला सांगितलं की, तू का हसत आहेस ते मला माहिती आहे. मी तेव्हा सचिनला प्रतिप्रश्न केला. तेव्हा त्याचं उत्तर देताना सचिन म्हणाला की, मी शतक पूर्ण होण्याआधीच बाद व्हावं, असं तुला वाटत होतं. त्याचं कारण म्हणजे मी शकत पूर्ण केलं तर आपण सामना हरू, अशी भीती तुला वाटत होती.
त्याला उत्तर देताना मी म्हणालो की, तुला माझ्या मनातलं कसं काय कळतं. तू दोन शतकी खेळी केल्यास. त्यातील एका सामन्यात आमचा पराभव झाला. तर एक सामना टाय झाला. त्यामुळे आज तुझं शतक पूर्ण झालं नाही हे बरंच झालं. या सामन्यात सचिन तेंडुलकरने झुंझार खेळी करताना ११५ चेंडूत ८५ धावा फटकावल्या होत्या. अखेरीस त्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.
सचिन आणि वीरेंद्र सेहवागने २००३ आणि २०११ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सलामीवीर म्हणून चोख भूमिका बजावली होती. त्यातील २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. तर २०११ मध्ये भारताने विजेतेपद पटकावले होते.