मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे नाते सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांनी सचिनला कसे घडविले हे मात्र, या दोघांनाच जवळून माहिती आहे. सचिन तेंडुलकर जेव्हा स्वतःची मॅच सोडून त्याच्या वयोगटाच्या वरच्या संघाची मॅच पाहायला गेलेला तेव्हा आचरेकर सरांनी त्याला चांगलेच झापले होते. हा प्रसंग वर्षभरापूर्वी सचिनने आपल्या ट्विटरवरील व्हिडीओतून सांगितला आहे.
शारदाश्रम शाळेच्या ज्युनिअर क्रिकेट संघाकडून सचिन खेळत असे. यावेळी आचरेकर सरांनी एका सराव सामना ठेवला होता. अगदी तेव्हाच वानखेडेवर सिनिअर संघ हॅरिस शिल्डचा सामना सुरु होता. यामुळे सचिन सराव सामन्याला न जाता वानखेडेवर पोहोचला. आचरेकरांना याची कुणकुण लागली अन् त्यांनी थेट वानखेडे गाठले.
यावेळी आचरेकर सरांनी सचिनला चांगलेच झापले. ''तुला दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवण्याची गरज नाही. आधी स्वतःचा खेळ सुधार, मग लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला येतील'', अशा शब्दांत त्यांनी सचिनला सर्वांदेखत डोस दिला. यातून धडा घेत सचिनने याच मैदानावर 2011 सालचा विश्वचषक जिंकत सरांचे स्वप्न पूर्ण केले.