मुंबई : भारतातील पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या आठवणी अजूनी ताज्या आहेत. पण एकदा तर क्रिकेटच्या पंचांना गोळी लागल्याची घटनाही घडली आहे.
लाहोरमध्ये दहा वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात बंदुका, ग्रेनेड आणि रॉकेट यांचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु होता. या सामन्यात राखीव पंच होते ते एहसान रझा आणि त्यांनाच एक गोळी लागली होती. त्यानंतर ते कोमामध्येही गेले होते. या हल्ल्यात रझा यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. एक गोळी त्यांच्या छातीला चाटून गेली होती, तर दुसरी गोळी त्यांच्या लिव्हरला लागली होती. रझा यांना या हल्ल्यानंतर उभं राहण्यासाठी सहा महिनांचा कालावधी लागला होता.
या सामन्यासाठीचे पंच, अधिकारी यांची गाडी लाहोरच्या गडाफी स्टेडियमला जात होती. या गाडीच्या काही अंतरावरच हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात पोलीस आणि स्थानिक नागरीकांचा मृत्यू झाला होता. बरेच लोक दुखापतग्रस्तही झाले होते.
रझा यांनी याबाबत सांगितले की, " माझ्या जखमा आता भरल्या आहेत. पण जेव्हा मला ती घटना आठवते तेव्हा अजूनही अंगावर काटा उभा राहतो. जेव्हा कुणी त्या घटनेबद्दल बोलायला लागते तेव्हा मला त्रास होतो. त्या ठिकाणी मी थांबत नाही. "