Hardik Pandya News : बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या आधी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळवला गेला. शनिवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ६० धावांनी विजय साकारला. सध्या अमेरिकेत ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने २३ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा कुटल्या. आयपीएलमध्ये संघर्ष करत असलेल्या हार्दिक पांड्याने सराव सामन्यापूर्वी आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल भाष्य केले.
'स्टार स्पोर्ट्स'शी संवाद साधताना हार्दिक पांड्या म्हणाला की, कठीण काळ येतच राहतो... मी यापासून पळ काढणार नाही त्याचा सामना करेन. मला विश्वास आहे की याचा सामना करूनच यश मिळवता येते. कधी कधी आयुष्य तुम्हाला अशा परिस्थितीत आणते, जिथे काही गोष्टी खूप कठीण असतात. परंतु माझा असा विश्वास आहे की, जर तुम्ही मैदान किंवा खेळ सोडला तर तुम्हाला तुमच्या खेळातून किंवा तुम्ही जे साध्य करायचा प्रयत्न करत आहात ते तुम्हाला मिळणार नाही.
पांड्याने सांगितला खडतर प्रवास तसेच कोणतीही गोष्ट अवघड असली तरी त्यातून मार्ग निघतो यावर विश्वास ठेवायला हवा. पूर्वी ज्या गोष्टी करायचो त्याच गोष्टी मी फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगला आणि वाईट काळ हा येतो आणि जातोही. हा प्रकृतीचा नियम आहे. अनेक वेळा अशा टप्प्यांतून गेलो आहे आणि यातूनही बाहेर येईन, असेही हार्दिक पांड्याने सांगितले.
दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषकात हार्दिक पांड्यावर भारताच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी आहे. ५ जून रोजी टीम इंडिया आयर्लंडविरूद्धच्या सामन्याने आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करेल. तर ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.