नवी दिल्ली : कर्नाटकविरुद्धच्या २००६ साली रणजी स्पर्धेतील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्ली संघाचे ड्रेसिंग रूममध्ये अत्यंत गंभीर वातावरण होते. एका कोपऱ्यात १७ वर्षीय विराट कोहली अत्यंत निराश बसलेला होता आणि रडण्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. कारण काही तासांपूर्वीच कोहलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळी पुनित बिस्ट दिल्ली संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज होता. कोहली ४ मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळेल.
या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने बिस्टने १६ वर्षांपूर्वीच्या त्या भावनिक क्षणाची आठवण सांगितली. सध्या मेघालयकडून खेळणारा बिस्ट त्यावेळी दिल्लीच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. कोहलीचे वडील प्रेम यांचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले होते. बिस्टने म्हटले की, ‘मी अजूनही विचार करतोय की, त्या प्रसंगी मैदानावर उतरण्याची हिंमत त्याने कुठून आणली होती. तो फलंदाजीसाठी सज्ज झालेला आणि आम्ही सर्वजण स्तब्ध झालो होतो. त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कारही झाले नव्हते आणि तो यासाठी पुढे आला होता की, त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाला एका फलंदाजाची कमतरता नको भासायला. कारण त्यावेळी दिल्ली संघाची स्थिती अत्यंत खराब झाली होती.’ त्यावेळी कर्णधार मिथुन मिन्हास आणि तत्कालीन प्रशिक्षक चेतन चौहान यांनी कोहलीला घरी परतण्याचा सल्लाही दिला होता. बिस्ट म्हणाला की, ‘चेतन सर आणि मिथुन भाईने विराटला घरी जाण्यास सांगितले होते. कारण इतक्या कमी वयात हा धक्का पचवणे विराटसाठी कठीण गेले असते, असे त्यांना वाटले होते. संघातील सर्वच सदस्यांचेही हेच मत होते; पण विराट कोहली वेगळ्याच मातीचा बनला आहे.’
बिस्टने दिल्लीकडून ९६ प्रथम श्रेणी सामन्यांतून ४३७८ धावा केल्या. त्याला कोहलीसोबत केलेली १५२ धावांची भागीदारी सर्वोत्तम वाटते. त्या सामन्यात बिस्टने १५६, तर कोहलीने ९० धावा केल्या होत्या. बिस्ट म्हणाला की, ‘विराटने आपले दु:ख मागे ठेवत जबरदस्त जिद्द दाखवली होती. त्याने शानदार फटके मारले होते आणि मैदानावर आमच्यात खूप कमी चर्चा झाली होती. तो केवळ जास्त वेळ खेळायचे आहे, बाद व्हायचे नाही, इतकेच म्हणाला होता. मला काय करायचे तेच समजत नव्हते. इतक्या वर्षांनंतरही विराट त्याच १७ वर्षीय खेळाडूप्रमाणे आहे. त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही.’
शंभरावी कसोटी विराटच्या कठोर मेहनत, समर्पित भावनेचा पुरावा
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विराट कोहलीच्याच नेतृत्वात कसोटी पदार्पण केले होते. आता तो विराटच्या शंभराव्या कसोटीत खेळण्याच्या तयारीत आहे. वेगवान माऱ्याचा आधारस्तंभ बनलेला बुमराह संघाचा उपकर्णधारदेखील आहे. विराटच्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पित वृत्तीचा हा मोठा पुरावा असल्याचे मत बुमराहने मंगळवारी व्यक्त केले.
- श्रीलंकेविरुद्ध चार मार्चपासून येथे सुरू होत असलेली कसोटी विराटचा शंभरावा सामना असेल. बुमराहने २०१८ ला विराटच्या नेतृत्वात पहिला कसोटी सामना खेळला होता. पत्रकारांशी बोलताना म्हणाला, ‘ही कुठल्याही खेळाडूसाठी मोठी उपलब्धी ठरते. विराटच्या कठोर मेहनतीचा आणि समर्पण भावनेचा हा पुरावा आहे. देशासाठी शंभरावी कसोटी खेळणे हा सन्मान असून विराटने देशासाठी बरेच योगदान दिले. भविष्यातही तो देत राहील.’
- या विशेष प्रसंगी कोहलीला तू कोणते बक्षीस देशील? असे विचारताच जसप्रीत म्हणाला, ‘भारतीय संघ विजयी होत असेल तर याहून मोठे बक्षीस कोणते नसेल. कोहली हा खेळाडू या नात्याने सर्वोत्कृष्ट योगदान देणे पसंत करतो.’
मोहाली कसोटीत ५० टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी
भारत- श्रीलंका यांच्यात ४ मार्चपासून येथे होणाऱ्या सामन्यादरम्यान एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीस बीसीसीआयने परवानगी दिली आहे. विराटचा हा १०० वा कसोटी सामना असेल. पंजाब क्रिकेट संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. विराटच्या ऐतिहासिक खेळीचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत. यासाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांचे आम्ही आभार मानतो, असे पीसीएचे कोषाध्यक्ष आर. पी. सिंगला यांनी म्हटले आहे.