जागतिक फुटबॉल विश्वातील दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं युरो चषक स्पर्धेतील एका पत्रकार परिषदेत केलेल्या कृतीमुळं सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पोर्तुगाल संघाच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोनाल्डोनं टेबलवर ठेवलेली 'कोकाकोला' कंपनीच्या बाटल्या उचलून बाजूला ठेवल्या होत्या आणि पाण्याची बाटली दाखवून त्याचं समर्थन केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियात एकच धुमाकूळ उडाला. रोनाल्डोनं सॉफ्ट ड्रिंक्स विरोधात उचलेलं हे पाऊन जगभरात चर्चेचा विषय बनलं. पण फक्त रोनाल्डोच नव्हे, तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानंही काही वर्षांपूर्वी असंच एक पाऊल उचललं होतं.
२०१७ साली भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं 'पेप्सी' कंपनीसोबतचा सहा वर्षांचा करार संपुष्टात आणला होता आणि कोट्यवधींची ऑफरवर पाणी सोडलं होतं. "ज्या गोष्टी मी स्वत: खात, पीत नाही, त्या मी दुसऱ्यांना कसं काय खाण्यास सांगू शकतो", असं ठाम मत व्यक्त करत कोहलीनं 'पेप्सी' कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला होता. फक्त पैसे कमावण्यासाठी मी लोकांना काहीही खाणं किंवा पिण्यास कसं सांगू? असा सवाल मनात उपस्थित झाला होता त्यामुळे पेप्सी कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचं कोहली म्हणाला होता.
ज्या गोष्टींचा मी स्वत: वापर करतो अशाच गोष्टींची मी जाहिरात करू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही देशाचं प्रतिनिधीत्व करताना फिटनेसवर भर देणं खूप गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतर मी माझ्या लाइफस्टाइलमध्ये खूप बदल केले. यात मी जंक फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्स घेणं बंद करण्याचा निर्णय घेतला. मग अशा कंपनींची जाहिरात करणं हे योग्य ठरणार नाही, असं कोहलीनं स्पष्ट केलं होतं.