खरं तर तुम्हाला ही गोष्ट कशी सांगायची, याचा विचार सुरू होता. काही वेळा वाटलं की सांगू नये, कारण त्याची ती तशी खासगीच बाब. काही गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नसतात. पण सेलिब्रिटींना सार्वजनिक आयुष्य नसतं, असं आपण म्हणतो, त्यामुळे हा खटाटोप. तर एके दिवशी काय झालं, तो आपला कोहली वरळीला आला. तिथे काही दिवस राहिला. पण त्याला वरळी काही पसंत पडलं नाही, ते का? याची ही गोष्ट. ही एक वात्रटिका आहे, त्यामुळे याबाबत कुणीही तसं वाईट वाटून घेऊ नये. काहींना ही गोष्ट वास्तववादी वाटली, तर तो निव्वळ योगायोग समजावा.
दक्षिण आफ्रिकेचा दौरा आटोपला. निघताना त्याच्या डोक्यात काही तरी निराळंच सुरू होतं. मुंबई ही आर्थिक राजधानी. सगळे जाहिरातीवाले तिथेच पडलेले असतात. शूटिंगही तिथेच होतं. त्यामुळे मुंबईत एक घर असावं, असं त्याला वाटलं. त्यामुळे त्यानं मुंबईत राहायचं ठरवलं. आपल्या बायकोलाही त्याने मुंबईला बोलावून घेतलं. आता यापुढचं आयुष्य काही दिवस आपण सर्वसामान्यांसारखं जगायचं, असं त्यानं मनोमन ठरवलं. मुंबईत तो विमानतळावर उतरला. कुणी ओळखू नये म्हणून चेहऱ्यावर फडका बांधला. रिक्षाच्या रांगेत उभा राहिला. तिथून थेट त्याने सांताक्रूझ स्टेशन गाठलं. तिकीट वगैरे काढण्याचं त्याच्या ध्यानातही नव्हतं. ट्रेन पकडून त्यानं लोअर परेल स्टेशन गाठलं. स्टेशनच्या जिन्यावरून बाहेर पडला. शेअर टॅक्सी पकडली. हे सारं त्याला झेपत नव्हतं खरं, पण काय करणार एकदा ठरवलं तर ठरवलं. जो मै नही कहता, वो डेफिनेटली करता हू... हे वाक्य त्यानं मनात घोटवलं. वरळी नाक्याला टॅक्सी थांबली. सारे प्रवासी उतरले. टॅक्सीवाल्यानं त्याला पैशांबद्दल विचारलं, तो बोलला, छुट्टा नही हैं. टॅक्सीवाला आता हुज्जत घालत बसणार हे त्याला समजलं होतं. त्याच्याकडे पैसे नव्हतेच. त्याने मग आपला चेहरा टॅक्सीवाल्याला दाखवला. त्यावर टॅक्सीवाला कोमातच जाणार होता. पण त्याने टॅक्सीवाल्याला सांगितलं, कुणाला सांगितलंस तर याद राख. इथे बीडीडी चाळी कुठे आहेत, असं त्यानं विचारल्यावर तर टॅक्सीवाल्याची विकेटच गेली. त्यानं फक्त हातानं रस्ता दाखवला, तसा तो उठला आणि बाहेर पडला.
बीडीडी चाळीत एक खोली त्याच्या नावावर काही दिवसांसाठी बूक केलेली होती. दुसऱ्या माळ्यावर खोली आहे हे त्याला ठाऊक होतं. पायऱ्या चढताना त्याने चाळ न्याहाळली. खरंच आपण इथं राहायचं का? हा प्रश्न त्याच्या मनात आला. पण त्याने पालीसारखा तो झटकला. कारण त्याची बायको त्या चाळीतल्या घरात वाट पाहत होती. आता प्लॅन बदलला तर बायको जगणं हराम करेल, हे त्याला चांगलं माहिती होतं. त्यामुळे चाळ चालेल, पण बायको आवर, हे त्याला पटलं. दुसऱ्या माळ्यावर तो चढला. खोलीच्या समोर उभा राहिला, दार ठोठावलं तेव्हा उत्तर भारतात नेसतात तशी साडी नेसून त्याची बायको घराबाहेर आली, कपाळावर कुंकू भरलेलं होतं. हातात स्टीलचं ताट होतं. त्यामध्ये निरंजन होतं, तिनं त्याला टिळा लावला, ओवाळलं, जिलबी भरवली. हे सारं त्या दोघांनाही नवीन होतं. चाळीतली लोक आपल्याला न्याहाळत आहेत, हे पाहून त्याने बायकोला थोडंसं आत ढकललं, घरात शिरला आणि दार लावून घेतलं. चेहऱ्यावरचा फडका काढला. बायकोकडे पाहून त्यानं स्मित केलं. आपण सेलिब्रिटी लाईफ सोडून या चाळीत कशाला आलो, असं त्याच्या बायकोला वाटत होतं. पण त्याची बायको, अभिनय करण्यात तरबेज होती. तिने चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही. तो मोरीत शिरला. तोंडावर पाण्याचे हबके मारले. प्युरिफायर किंवा शॉवर नावाच्या गोष्टी तिथं नव्हत्या. प्लॅस्टिकच्या बादलीत त्याने ड्रममधून पाणी घेतलं. लाईफबॉय होता. त्याने आंघोळ कशीबशी उरकली. बायकोनं जेवण खालच्या खानावळीतून मागवलं होतंच. जेवायला बसला. जेवणासाठी चमचे नव्हते. त्याला थोडंसं बरं वाटलं. इथे तरी कुणी चमचे नाहीत, ही गोष्ट त्याला आवडली.
प्रवास बराच झाला होता. आता जेवणंही झालं. थोडंसं प्रेशर आलं होतं. घरात टॉयलेट नसेल, असं त्याला वाटलं नव्हतं. पण आता या लोकांसारखंच त्यानं जगायचं ठरवलं होतं. त्यामुळं पँट उतरवली टॉवेल गुंडाळला आणि हातात टमरेल घेऊन तो सार्वजनिक टॉयलेटकडे चालायला लागला. इथे 'त्या'साठी रांग असते, असं त्याच्या गावीही नव्हतं. पाहिलं तर चार माणसं पुढे होती. आता काय, उभं राहणं तर भागच होतं. एक जण गेला. तीन राहिले. काही वेळाने दुसरा आतमध्ये गेला. पण आता काही त्याला राहवत नव्हतं. काही गोष्ट अशा असतात की, त्याचा कंट्रोल तुमच्या हातात नसतो. त्याचा संयम सुटला. तो थेट त्या टॉयलेटच्या दरवाजाजवळ गेला. तोंडावरचा फटका बाजूला सारला आणि आतल्या माणसाला जोरजोरात शिव्या घालायला लागला. बाकीची पाहून लोकं हडबडली. त्याच्या शिव्या एवढ्या भयानक होत्या की, त्या लोकांना या शिव्यांची सवय तशी नव्हती. आतला माणूस बाहेर आला. त्याला कोहलीनं ढकललं. आतमध्ये टमरेल घेऊन शिरला. आतमध्ये विड्यांचा धूर होता. कसला तरी घाणेरडा वास होता. त्यानं नाक दाबून आपलं कार्य उरकलं. तिथे विड्यांचे काही तुकडे होते. खडू आणि विटांचे तुकडेही होते. त्याने आपला कार्यभाग साधल्यावर एक खडू उचलला आणि शिव्यांची बाराखडीच त्यानं लिहून काढली. उद्वेगानं तो बाहेर आला, लोकांकडं पाहिलंच नाही, थेट घरात शिरला आणि बायकोला म्हणाला, " या वरळीत यापुढे पाय ठेवायचा नाही, चल आपण वांद्रे - वर्सोवा दरम्यान नवा पेंटहाऊस घेतोय, तोपर्यंत दिल्लीलाच राहू."