मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे भारताला गाशा गुंडाळावा लागला. आज भारताला सामना नामिबियाशी होत आहे. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा सामना असेल. यानंतर कोहली टी-२० सामन्यांत भारताचं नेतृत्त्व करताना दिसणार नाही. कर्णधार म्हणून कोहलीला विराट यश मिळालेलं नाही. मात्र फलंदाज म्हणून त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. मात्र कोहलीच्या कारकिर्दीची सुरुवात फारशी चांगली नव्हती.
२०११ मध्ये विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी मालिका खेळला. तीन कसोटींमध्ये त्याला केवळ ७६ धावाच करता आल्या. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. संघात परतल्यानंतरही बराच वेळ तो बेंचवरच बसून होता. त्याला संधी मिळत नव्हती. २०११ च्या शेवटी भारतात झालेल्या मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याची संधी अखेर विराटला मिळाली. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. तिथल्या वातावरणात कोहलीला इतर भारतीय फलंदाजांप्रमाणेच बराच संघर्ष करावा लागला.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी विराटचं संघातलं स्थान धोक्यात होतं. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी संघाचा कर्णधार होता, तर विरेंद्र सेहवागकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. कोहलीला वगळण्यात येणार होतं. मात्र धोनी आणि सेहवाग त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे विराटचं स्थान कायम राहिलं. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या सेहवागनं हा किस्सा सांगितला आहे.
'निवड समितीला विराट कोहलीला वगळायचं होतं. मात्र मी आणि धोनीनं कोहलीला पाठिंबा दिला. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थला झालेल्या कसोटीत कोहलीच्या जागी रोहित शर्माला संधी मिळणार होती. त्यावेळी मी उपकर्णधार होतो आणि धोनीकडे नेतृत्त्व होतं. आपण कोहलीच्या पाठिशी उभं राहायला असं आम्ही ठरवलं. त्यानंतर पुढे घडलेल्या घडामोडी इतिहास आहेत,' असं सेहवागनं सांगितलं.
धोनी आणि सेहवागचा पाठिंबा विराटच्या कारकिर्दीसाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर कोहलीला कधीच संघाबाहेर जावं लागलं नाही. पर्थ कसोटीच्या पहिल्या डाव्यात कोहलीनं ४४, तर दुसऱ्या डाव्यात ७५ धावा केल्या. ही कसोटी भारतानं १ डाव आणि ३७ धावांनी जिंकली.
Web Title: when virender sehwag revealed how he and ms dhoni saved virat kohli from getting dropped
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.