भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या लढतीत गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. आता भारताचा पुढील सामना हा २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. त्या सामन्यात हार्दिक पांड्या हा भारतीय संघाच परतणार का, याबाबत क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, हार्दिक पांड्याच्या पायात केवळ लचक भरली आहे. ती काही गंभीर बाब नाही. हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी लखनौमध्ये उपलब्ध असला पाहिजे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या हा तंदुरुस्त होण्याची शक्यता असल्याने त्याला पर्यायी खेळाडूची घोषणा करण्याची बीसीसीआयची कुठलीही योजना नाही आहे, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला होता. त्यानंतर त्याला उर्वरित सामन्यामध्ये खेळता आले नव्हते. तसेच तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकला होता. सध्या हार्दिक पांड्या बंगळुरूमधील एनसीएमध्ये उपचार घेत आहे.